कोलवडचे भूमिपुत्र आरटीओ विनोद जाधव यांना 'समाजऋण पुरस्कार';पुणे येथे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते झाला सन्मान!

 
बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : वाहतूक नियमनासंदर्भात मोटार वाहन निरीक्षक विनोद जाधव यांनी तयार केलेल्या ॲपसाठी, तसेच उद्योजक सागर सोळंकी व फहीम अरब यांना त्यांच्या उद्योग क्षेत्रातील योगदानासाठी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते 'शिवनेरी समाजऋण पुरस्कार २०२५' देऊन सन्मानित करण्यात आले. कोलवड (ता.जिल्हा बुलढाणा) येथील मूळ रहिवासी असलेले विनोद जाधव हे सध्या पुणे येथे कार्यरत आहेत. 

विनोद जाधव यांनी आरटीओ विभागात वापरल्या जाणाऱ्या वाहन ,सारथी, ई चलान, व आयरॅड या साफटवेअर सुधारणा समितीत काम केले. जनतेची कार्यालयीन कामे सोपी करण्यासाठी या सुधारणांचा ऊपयोग झाला आहे. विभागातील नाविन्यपूर्ण उपक्रमात नेहमीच सहभागी असतात.

 शिवनेरी रिक्षा संघटना व शिवनेरी प्रतिष्ठानच्या वतीने रिक्षा चालकांच्या गुणवंत पाल्यांचा सन्मान आणि समाजातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांना शनिवारी 'समाजऋण पुरस्कार' देऊन सन्मानित करण्यात आले. शिष्यवृत्ती वितरण व पुरस्काराचे हे पंधरावे वर्ष होते. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, अ. भा. मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे, आमदार योगेश टिळेकर व अन्य  उपस्थित होते. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा, ज्येष्ठ रिक्षा चालक तसेच प्रवाशांशी प्रामाणिक असलेल्या रिक्षा चालकांचा देखील सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन संघटनेचे संस्थापक आबा बाबर व अध्यक्ष अशोक साळेकर यांनी केले होते. सूत्रसंचालन जबीन पटेल यांनी केले, तर प्रतीक साळेकर व यश बाबर यांनी आभार मानले. आपल्या स्वभाव गुणांमुळे लोकप्रिय असलेल्या आरटीओ विनोद जाधव यांना मिळालेल्या पुरस्कारामुळे मातृतीर्थ  बुलढाणा जिल्ह्यातही त्यांचे अभिनंदन केले जात आहे.