खामगाव-जालना रेल्वेमार्गाला तात्काळ मंजुरी द्यावी; प्रतापराव जाधव यांची रेल्वेमंत्र्यांकडे आग्रही मागणी; दिल्लीतील भेटीत केंद्रिय रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांना दिले निवेदन..!

 
बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : इंग्रज काळापासून प्रलंबित असलेल्या खामगाव-जालना रेल्वेमार्गाला केंद्र सरकारकडून तात्काळ मंजुरी मिळावी, अशी आग्रही मागणी केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री तथा बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी केली आहे. त्यांनी २४ सप्टेंबर रोजी दिल्ली येथे केंद्रीय रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांची प्रत्यक्ष भेट घेऊन याविषयी निवेदन दिले. 
२०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खामगाव येथील जाहीर सभेत हा प्रकल्प जलद गतीने पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. महाराष्ट्र सरकारने १५ मार्च २०२४ रोजी या रेल्वेमार्गासाठी लागणाऱ्या ५० टक्के खर्चाची जबाबदारी स्वीकारून प्रस्ताव रेल्वे मंत्रालयाकडे पाठवला आहे. तरीदेखील हा प्रकल्प अद्याप प्रलंबित आहे. खामगाव-जालना रेल्वेमार्गामुळे विदर्भ व मराठवाडा हे दोन विभाग एकमेकांशी जोडले जातील. तसेच मध्य आणि दक्षिण रेल्वेमार्गातील अंतर कमी होऊन प्रवास सुलभ होईल. या मार्गामुळे व्यापार, पर्यटन, कृषी व औद्योगिक विकासाला चालना मिळेल.


बुलढाणा जिल्ह्यात राष्ट्रमाता जिजाऊंचे जन्मस्थळ, लोणारचे जगप्रसिद्ध खाऱ्या पाण्याचे सरोवर आणि शेगाव येथील संत गजानन महाराजांचे समाधीस्थळ असल्यामुळे या भागाला देश-विदेशातून मोठ्या प्रमाणावर पर्यटक भेट देतात. खामगाव-जालना रेल्वेमार्ग झाल्यास या सर्व ऐतिहासिक व धार्मिक स्थळांपर्यंत पोहोचणे अधिक सोपे होईल. या रेल्वेमार्गासाठी नागरिक, लोकप्रतिनिधी, सामाजिक संघटना आणि रेल्वे लोकआंदोलन समितीचे सदस्य सतत पाठपुरावा करीत आहेत. नागरिक या प्रकल्पाबाबत आस्थेने विचारपूस करतात आणि प्रलंबनाबाबत चिंता व्यक्त करतात. त्यामुळे हा मार्ग केवळ विकासापुरता मर्यादित नसून तो लोकभावनेशीही निगडित असल्याचे प्रतापराव जाधव यांनी आपल्या निवेदनात नमूद केले. या भेटीदरम्यान केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनीही या मागणीबाबत सकारात्मक भूमिका दर्शवली असून, प्रकल्पास मंजुरी देण्याबाबत गांभीर्याने विचार करण्याचे संकेत दिले आहेत.