जमलं हो जमलं!खामगाव-जालना रेल्वे मार्गाला मोठी गती; भूमी अधिग्रहणाची अधिसूचना राजपत्रात प्रकाशित! बुलढाणा जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी; केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचा पाठपुराव्याला यश....

 
बुलढाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):बुलढाणा जिल्ह्याच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या खामगाव-जालना नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्ग प्रकल्पाला अखेर मोठी गती मिळाली आहे. या रेल्वे मार्गासाठी आवश्यक भूमी अधिग्रहण करण्यासंदर्भातील अधिसूचना केंद्र सरकारच्या राजपत्रात प्रकाशित झाली असून, जिल्हावासीयांसाठी ही अत्यंत आनंदाची आणि ऐतिहासिक घडामोड ठरत आहे. या प्रकल्पासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे बुलढाण्याचे खासदार तथा केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले आहेत.
खामगाव-जालना रेल्वे मार्ग हा बुलढाणा जिल्ह्याच्या आर्थिक, औद्योगिक आणि सामाजिक विकासाला चालना देणारा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मानला जातो. मध्य रेल्वे आणि दक्षिण-मध्य रेल्वे यांना जोडणाऱ्या या रेल्वे मार्गाला केंद्र सरकारने पुंजी निवेश कार्यक्रमांतर्गत मंजुरी दिली आहे. या प्रकल्पासाठी लागणाऱ्या निधीपैकी ५० टक्के हिस्सा महाराष्ट्र शासनाने उचलण्याची तरतूद राज्याच्या अर्थसंकल्पात करण्यात आली होती. त्यानंतर संबंधित प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला होता.

केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी या प्रकल्पासाठी रेल्वे मंत्रालय आणि केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून, भूमी अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू करण्यासाठी आवश्यक अधिसूचना राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

रेल्वे (सुधारणा) अधिनियम २००८ अंतर्गत रेल्वे अधिनियम १९८९ च्या कलम ३७एन्वये केंद्र सरकारने "जालना-खामगाव दरम्यान नवीन ब्रॉडगेज (BG) मार्ग प्रकल्प (१६२ किमी)" हा विशेष रेल्वे प्रकल्प म्हणून अधिसूचित केला आहे. महाराष्ट्रातील जालना आणि बुलढाणा जिल्ह्यांमधील आवश्यक जमीन संपादन करून राष्ट्रीय पायाभूत सुविधा उभारण्याच्या सार्वजनिक उद्देशाने ही अधिसूचना लागू करण्यात आली असून, राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून ती प्रभावी झाली आहे.

या अधिसूचनेमुळे अनेक दशकांपासून प्रलंबित असलेल्या खामगाव-जालना रेल्वे मार्गाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील उद्योग, व्यापार, शेतीमाल वाहतूक आणि रोजगारनिर्मितीला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

विशेष : रेल्वे मार्गासाठी प्रतापराव जाधव यांचे सातत्यपूर्ण प्रयत्न

इंग्रजकालापासून प्रलंबित असलेला खामगाव-जालना रेल्वे मार्ग हा बुलढाणा जिल्ह्यातील जनतेच्या जिव्हाळ्याचा विषय राहिला आहे. अनेक लोकसभा निवडणुकांमध्ये हा मुद्दा प्रमुख ठरला होता. सन २००९ मध्ये प्रथमच लोकसभेत निवडून गेल्यानंतर खासदार प्रतापराव जाधव यांनी या रेल्वे मार्गासाठी सातत्याने प्रयत्न सुरू केले. लोकसभेत वेळोवेळी प्रश्न उपस्थित करून त्यांनी हा विषय लावून धरला, ज्यामुळे या प्रकल्पाच्या सर्वेक्षणाला मंजुरी मिळाली.

यानंतर केंद्र सरकारने या रेल्वे मार्गाला तत्त्वतः मान्यता दिली. महाराष्ट्र शासनाकडून ५० टक्के निधीची तरतूद व्हावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच तत्कालीन उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा करण्यात आला. राज्य शासनाने निधीची तरतूद करून प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविला.

केंद्र सरकारचा निधी मंजूर व्हावा यासाठी प्रतापराव जाधव यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची वारंवार भेट घेऊन प्रकल्पाचा पाठपुरावा केला. अखेर भूमी अधिग्रहणाची अधिसूचना राजपत्रात प्रसिद्ध झाल्याने या महत्त्वाकांक्षी रेल्वे मार्गाच्या उभारणीचा मार्ग प्रशस्त झाला आहे.

२०१४ मध्ये खामगाव येथील जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा रेल्वे मार्ग पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. त्या आश्वासनाच्या पूर्ततेच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल असल्याची भावना जिल्हावासीयांमध्ये व्यक्त होत आहे. भूमी अधिग्रहणाची अधिसूचना प्रसिद्ध झाल्याबद्दल केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे विशेष आभार मानले आहेत.