खामगाव तालुका कोरडा दुष्काळाच्या छायेत; बोरी-अडगाव येथे शेतकऱ्यांचे आमरण उपोषण पाचव्या दिवशीही कायम, प्रशासनाचे दुर्लक्ष...

 
खामगाव(भागवत राऊत:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): खामगाव तालुक्यात पावसाने पाठ फिरवल्याने खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेला आहे. शेतात पीक नाही, हातात पैसा नाही, अशा दुहेरी संकटात सापडलेल्या शेतकऱ्याने अखेर प्रशासनाच्या दारात ठिय्या मांडला आहे.

कोरडा दुष्काळ जाहीर करा आणि सरसकट कर्जमाफी करा या प्रमुख मागणीसह बोरी-अडगाव ग्रामपंचायत समोर १२ सप्टेंबर रोजी सायं. ६ वाजेपासून सुरू झालेले आमरण उपोषण आज १६ सप्टेंबर रोजी पाचव्या दिवशीही सुरूच आहे. उपोषणकर्ते राधेश्याम रमेश किर्ले आणि गौतम समाधान सुरवाडे यांनी मंडपात ठाण मांडले आहे. सोबत छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना वंदन करून हे उपोषण सुरू करण्यात आले आहे.पाच दिवस उलटूनही तहसीलदार किंवा कृषी विभागाचा एकही अधिकारी भेट द्यायला आला नाही, असा आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे. सततच्या उपवासाने दोघांचीही प्रकृती खालावली आहे. मागण्या मान्य होईपर्यंत माघार नाही, या भूमिकेवर दोघेही ठाम आहेत. २०२४ मध्ये झालेल्या शेतकरी आंदोलनातील शेतकऱ्यांवरील गुन्हे तात्काळ रद्द करा. तात्काळ नुकसान भरपाई देऊन खामगाव तालुका कोरडा दुष्काळ जाहीर करा. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या. शेतीला दिवसा वीज आणि दिवसा पाणी द्या. रखडलेला पीक विमा त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा. प्रशासनाच्या या असंवेदनशीलतेविरोधात आता आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे. वंचित बहुजन आघाडीचे युवा कार्यकर्ते विकी सुरवाडे आणि अरविंद सुरवाडे  यांनी सांगितले की, "जर पुढील ४८ तासात प्रशासनाने दखल घेऊन लेखी आश्वासन दिले नाही, तर बोरी-अडगाव ते खामगाव (तहसील कार्यालय) असा पायी लाँग मार्च काढण्यात येईल. याला हजारो शेतकरी, तरुण सहभागी होतील आणि याची सर्व जबाबदारी प्रशासनाची असेल." या उपोषणाला परिसरातील शेतकरी, वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आणि ग्रामस्थांचा मोठा पाठिंबा मिळत असून, खामगाव तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे.