काशिनाथ आप्पा चिखली नगर परिषदेत लोकशाहीचे दर्शन घडवतील; आ. सिद्धार्थ खरात यांची प्रतिपादन; नरेंद्र खेडेकर म्हणाले, चिखलीकरांना महाविकास आघाडी सन्मान आणि सुरक्षितता देईल...
Nov 30, 2025, 13:46 IST
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चिखली नगर परिषदेचे महाविकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार काशिनाथ आप्पा बोंद्रे हे सुसंस्कृत आणि दयावान नेतृत्व आहे. सामान्य लोकांच्या प्रश्नांची त्यांना जाण आहे. अडीअडचणीच्या काळात ते लोकांसाठी धावून जातात. त्यांचा हुकूमशाही वर नव्हे तर लोकशाहीवर विश्वास आहे आणि चिखली नगरपरिषदेत सामान्य जनांसाठी देखील ते लोकशाहीचे दर्शन घडवतील असे प्रतिपादन मेहकर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ खरात यांनी केले. चिखली शहरातील प्रभाग क्रमांक १३ मध्ये आयोजित एका कॉर्नर मिटिंग मध्ये संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते नरेंद्र खेडेकर, संदेश आंबेडकर, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल बोंद्रे , महाविकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार काशिनाथ आप्पा बोंद्रे उपस्थित होते.
पुढे बोलतांना सिद्धार्थ खरात म्हणाले की, राज्यात आणि केंद्रात भ्रष्टाचाराने थैमान घातले आहे. सत्ताधारी लोकांना सामान्य लोकांच्या सुखा दुःखाशी देणे घेणे नाही. त्यांना केवळ सत्ता प्रिय आहे. आता सामान्य लोकांची प्रेरणा जागृत होत आहे, सत्ताधाऱ्यांचा खेळ सामान्यांच्या लक्षात आला आहे. परिवर्तनाच्या या लढाईची सुरुवात नगर परिषदेच्या निवडणुकीपासून होत असल्याचे आ. सिद्धार्थ खरात म्हणाले. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार काशिनाथ आप्पा बोंद्रे यांच्यासह सर्वच नगरसेवक पदाच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले.
चिखलीकरांच्या सुरक्षिततेसाठी महाविकास आघाडी– नरेंद्र खेडकर
चिखली शहराला विकासाच्या नव्या उंचीवर नेण्यासाठी काशिनाथ आप्पा बोंद्रे यांचे नेतृत्व सक्षम आहे. सामान्य चिखलीकरांना सन्मान आणि सुरक्षितता प्रदान करण्याचे काम महाविकास आघाडी करेल. विरोधकांच्या अफवांना बळी न पडता काशिनाथ आप्पा बोंद्रे यांच्या पाठीशी आपली ताकद उभी करा असे आवाहन शिवसेनेचे ज्येष्ठ नेते नरेंद्र खेडेकर यांनी यावेळी केले.
