झेडपीचा सीईओ म्हणतो, "बाई मेली तरी फरक पडत नाही!" भ्रष्टाचारा विरोधात लढा देणाऱ्या उपोषणकर्त्या महिलेचे गंभीर आरोप; सिंदखेडराजातली वडाळी ग्रामपंचायत सरपंच ग्रामसेवकाने संगणमताने खाल्ली!
महिलेचे बुलढाण्यात आमरण उपोषण...
Jan 2, 2026, 15:31 IST
बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): सिंदखेडराजा तालुक्यातील वडाळी ग्रामपंचायत भ्रष्टाचाराने बरबटली आहे. सरपंच आणि ग्रामसेवकांनी मिळून लाखो रुपयांचा अपहार केला आहे. ग्रामपंचायतीच्या जमाखर्चाचा हिशोब मागितला म्हणून सरपंच पती शिवीगाळ करतो, घरी येऊन जीवे मारण्याचा धमक्या देतो.. जनतेचा पैसा खाणाऱ्यांवर कारवाई व्हावी म्हणून मी उपोषणाला बसले..मात्र झेडपीचा सीईओ म्हणतो की, "बाई मेली तरी मला फरक पडत नाही" असा गंभीर आरोप वडाळी येथील विद्या संदीप कापसे यांनी केला आहे. गेल्या ३ दिवसांपासून बुलढाणा जिल्हा परिषदेच्या कार्यालयासमोर त्या आमरण उपोषणाला बसल्या आहेत..मात्र संबंधित अधिकाऱ्यांनी या उपोषणाची कोणतीही दखल घेतलेली नाही.
माध्यम प्रतिनिधींशी बोलताना विद्या कापसे ढसाढसा रडल्या. सरपंच आणि ग्रामसेवकांनी मिळून ग्रामपंचायतीत लाखो रुपयांचा अपहार केलेला आहे. जनतेचा पैसा खाल्ला आहे.. माहितीच्या अधिकारात याबाबत माहिती समोर आल्यानंतर सिंदखेड राजा पंचायत समितीकडून चौकशी झाली. मात्र केवळ चौकशीवरच हे प्रकरण मॅनेज झाले का? असा सवाल सौ.कापसे यांनी उपस्थित केला. सरपंच आणि ग्रामसेवकाने २ लाख ६४ हजार रुपयांचा अपहार केल्याचे समोर आले, दोघांकडून ती वसुली करण्यात यावी असे आदेश असतांना वसुली झाली नाही व फौजदारी गुन्हा देखील दाखल झाला नाही असेही सौ. कापसे यांनी सांगितले. जोपर्यंत दोषी सरपंच, तत्कालीन ग्रामसेवक जे.एस.नागरे आणि विस्तार अधिकारी यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत उपोषण थांबवणार नाही असा इशाराही सौ.कापसे यांनी दिला. मी उपोषणाला बसल्यानंतर तसा निरोप सीईओंकडे पाठवला, तेव्हा "बाई मेली तरी मला फरक पडत नाही" असे सीईओंनी म्हटले असल्याचा दावा उपोषणकर्त्या सौ. कापसेंनी केला आहे.
