जळालेली डिपी तात्काळ बसवा, नाहीतर आंदोलन तीव्र करू; आज लोकशाही मार्गाने आलो, उद्या भगतसिंगाच्या मार्गाने येऊ – शुभम घोंगटे

महावितरण अधिकाऱ्यांच्या खुर्चीवर टाकला वाळलेला चारा; मोताळा कार्यालयात युवासेनेचे ठिय्या आंदोलन...

 
मोताळा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) :  तालुक्यातील आव्हा गावातील जळालेला ट्रान्सफार्मर तात्काळ बसविण्यात यावा, या मागणीसाठी युवासेना उपजिल्हा प्रमुख शुभम घोंगटे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेत मोताळा येथील महावितरण कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांच्या खुर्चीवर वाळलेला ज्वारीचा चारा टाकत निषेध व्यक्त केला.
“आज लोकशाही मार्गाने आलो आहोत, उद्या गरज पडली तर भगतसिंगाच्या मार्गाने यावे लागेल,” असा इशारा शुभम घोंगटे यांनी दिल्याने महावितरण प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली.

जळालेला ट्रान्सफार्मर तात्काळ देण्यात यावा, अन्यथा कार्यालयाच्या दालनातून उठणार नाही, अशी ठाम भूमिका घेत शुभम घोंगटे, अमोल देशमुख यांच्यासह शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले. अखेर संबंधित अधिकाऱ्यांशी फोनवर चर्चा झाली असता, “उद्या सकाळीच ट्रान्सफार्मर बसवून वीजपुरवठा सुरू केला जाईल,” असे आश्वासन देण्यात आले. त्यानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले.
आव्हा गावातील बसस्टँडजवळील गावठाण ट्रान्सफार्मर गेल्या अनेक दिवसांपासून नादुरुस्त होता. कधी एक, तर कधी दोन फ्युज नसल्यामुळे वीजपुरवठा वारंवार खंडित होत होता. शेतकऱ्यांनी वायरमनकडे तक्रारी केल्या; मात्र उडवाउडवीची उत्तरे मिळाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला.
दरम्यान, संबंधित अधिकारी वारंवार गैरहजर असतानाच ट्रान्सफार्मरची केबल जळाली. हतबल झालेल्या शेतकऱ्यांनी सावरगाव सबस्टेशन, मोताळा व मलकापूर येथील महावितरण कार्यालयात केबलसाठी धाव घेतली. मात्र “केबल उपलब्ध नाही,” असे उत्तर देण्यात आले.
चार-पाच दिवसांनंतर एका वायरमनने साडेसहा हजार रुपयांना केबल विकल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. शेतकऱ्यांनी वर्गणी करून ती केबल बसवली; मात्र काही दिवसांतच ट्रान्सफार्मर जळाला. त्यानंतर पुन्हा पैसे गोळा करण्याची मागणी होताच शेतकऱ्यांचा संताप उफाळून आला.

ही बाब सामाजिक कार्यकर्ते शुभम घोंगटे यांच्या निदर्शनास येताच त्यांनी शेतकऱ्यांसह वाळलेला ज्वारीचा चारा घेऊन महावितरण कार्यालय गाठले. कार्यालयात अधिकारी नसल्याने रिकाम्या खुर्चीला निवेदन देत खुर्चीवर चारा टाकून निषेध नोंदविण्यात आला.
आक्रमक आंदोलन व इशाऱ्यानंतर स्थानिक अधिकाऱ्यांनी फोनवरून हस्तक्षेप करत उद्या ट्रान्सफार्मर देण्याचे ठोस आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलनाची सांगता करण्यात आली.
यावेळी युवासेना उपजिल्हा प्रमुख शुभम घोंगटे, नगरसेवक अमोल देशमुख, परमेश्वर सुरडकर, अशोक घोंगटे, कन्हैया सूर्यवंशी, श्रीकृष्ण गवळी, अमोल घोंगटे, दीपक घोंगटे, दिलीप कुकळे, अर्जुन सुरडकर यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.