देऊळगाव राजात नागरी प्रश्नांवरून राजकीय वातावरण तापले; नगरसेवक-गटनेत्यांची आक्रमक भूमिका; नगराध्यक्षांचे तातडीने तोडगा काढण्याचे आश्वासन...
प्रभाग क्रमांक १० मधील समस्या मांडताना नगरसेविका दिशा किशोर खांडेभराड यांनी आमना नदी ते पिंपळनेर मार्गावरील काळुकादेवी मंदिरासमोरील बंद पडलेले हायमास्ट दिवे तात्काळ सुरू करण्याची मागणी केली. या मार्गावर रात्री अंधार पसरत असल्याने महिला, ज्येष्ठ नागरिक व भाविकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत असून चोरी व अपघाताची शक्यता वाढत असल्याचे त्यांनी निवेदनात नमूद केले.
नगरपालिकेतील विरोधी पक्षाच्या गटनेत्या रंजना अनिल रामाने व इतर नगरसेवकांनी शहरातील भटक्या कुत्र्यांचा वाढता वावर, साचलेला कचरा आणि नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित प्रश्न तातडीने सोडवण्याची मागणी केली. यासोबतच राज्यातील ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्या स्मरणार्थ पालिकेने उभारलेल्या शॉपिंग कॉम्प्लेक्सला त्यांचे नाव देण्याची मागणीही करण्यात आली आहे.
निवेदन सादर करताना नगराध्यक्षा माधुरी शिपने, उपनगराध्यक्षा वनिता भुतडा व मुख्याधिकारी अरुण मोकळ उपस्थित होते. निवेदनावर दिशा खांडेभराड, रंजना रामाने, कासिफ कोटकर, शिवाजी मेहत्रे, अन्वर शेख, विद्या कासारे, शितल खराट आदी नगरसेवकांच्या स्वाक्षऱ्या आहेत. शहरातील मूलभूत सुविधा, स्वच्छता व सुरक्षिततेचे प्रश्न तातडीने मार्गी लागतात का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, पालिका प्रशासनाने हायमास्ट दिवे सुरू करणे, भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण, स्वच्छता मोहीम आणि प्रलंबित कामांना गती देण्याची प्रक्रिया सुरू केल्याची माहिती नगराध्यक्षा माधुरी शिपने यांनी दिली. शॉपिंग सेंटरला अजित पवार यांचे नाव देण्याबाबत प्रशासन सकारात्मक असून पुढील प्रशासकीय कार्यवाही लवकरच पूर्ण केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.