PM-KISAN लाभार्थी शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! ३१ ऑक्टोबरपूर्वी आधार लिंक अन् e-KYC पूर्ण करा; नाहीतर योजनेचा लाभ अडकण्याची शक्यता! बुलढाणा जिल्ह्यात विशेष मोहीम;

४,१०१ लाभार्थ्यांची बँक खाती आधारशी लिंक नाहीत, तर २,०२८ जणांची e-KYC प्रलंबित...
 
बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. योजनेतील प्रलंबित अनिवार्य अटी पूर्ण करण्यासाठी २ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांनी आधार संलग्नीकरण आणि e-KYC तातडीने पूर्ण करून घेण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी केले आहे. PM-KISAN योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना DBT पद्धतीने आर्थिक मदत दिली जाते. मात्र हा लाभ पात्र आणि प्रमाणित लाभार्थ्यांनाच मिळावा यासाठी केंद्र सरकारने Land Seeding, Aadhaar Seeding आणि e-KYC या बाबी अनिवार्य केल्या आहेत.

बुलढाणा जिल्ह्यात अद्यापही काही लाभार्थ्यांच्या या प्रक्रिया प्रलंबित आहेत. त्यामुळे ३१ ऑक्टोबरपूर्वी आवश्यक प्रक्रिया पूर्ण न केल्यास योजनेचा लाभ मिळण्यात अडचणी निर्माण होऊ शकतात.

४,१०१ लाभार्थ्यांची बँक खाती आधारशी लिंक नाहीत

जिल्ह्यातील तब्बल ४ हजार १०१ लाभार्थ्यांची बँक खाती अद्याप आधार क्रमांकाशी संलग्न झालेली नाहीत. अशा लाभार्थ्यांनी संबंधित बँकेच्या शाखेत जाऊन आपले बँक खाते आधारशी लिंक करून घ्यावे.तसेच इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (IPPB) मार्फत आधार संलग्न बँक खाते उघडण्याची सुविधाही उपलब्ध आहे. प्रक्रिया करताना अडचण आल्यास संबंधित बँक, सहाय्यक कृषी अधिकारी किंवा कृषी विभागातील कर्मचाऱ्यांशी संपर्क साधता येईल.

२,०२८ लाभार्थ्यांची e-KYC अद्याप बाकी

योजनेचा लाभ योग्य आणि जिवंत लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी e-KYC अनिवार्य करण्यात आली आहे. जिल्ह्यातील २ हजार २८ लाभार्थ्यांची e-KYC अद्याप प्रलंबित आहे.

याशिवाय सन २०२६-२७ साठी वार्षिक e-KYC प्रलंबित असलेल्या तब्बल २ लाख ६३ हजार ८०७ लाभार्थ्यांनीही e-KYC पूर्ण करणे आवश्यक आहे.

यासाठी शेतकऱ्यांना जवळच्या सामाईक सुविधा केंद्र (CSC) येथे जाऊन बायोमेट्रिक प्रमाणीकरण करता येईल. तसेच PM-KISAN मोबाईल ॲपच्या माध्यमातून Face Authentication वापरूनही e-KYC पूर्ण करता येते.

३१ ऑक्टोबरची अंतिम मुदत; दुर्लक्ष करू नका!

विशेष मोहिमेच्या कालावधीतही अनिवार्य प्रक्रिया पूर्ण न करणाऱ्या लाभार्थ्यांना केंद्र शासनाच्या निर्देशानुसार विहित प्रक्रियेतून नव्याने अर्ज करून आवश्यक पडताळणी करावी लागू शकते.त्यामुळे PM-KISAN योजनेचा लाभ घेणाऱ्या सर्व पात्र शेतकऱ्यांनी आपली Land Seeding, Aadhaar Seeding आणि e-KYC यापैकी कोणतीही प्रक्रिया प्रलंबित आहे का, हे तपासावे आणि आवश्यक ती पूर्तता ३१ ऑक्टोबर २०२६ पूर्वी करून घ्यावी, असे आवाहन कृषी प्रशासनाने केले आहे.