एसटी स्थानक परिसरातील अवैध वाहतुकीवर प्रशासनाचा मोठा दणका; २०० मीटर परिसरात नियमभंग करणाऱ्या वाहनांची थेट जप्ती, १० दिवसांत २७० वाहनांवर कारवाई...
प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, एसटी बसस्थानकाच्या २०० मीटर परिसरात कोणत्याही प्रकारची अनधिकृत प्रवासी वाहतूक, प्रवासी उचलणे- सोडणे किंवा नियमबाह्य पार्किंग आढळल्यास संबंधित वाहनांवर दंडात्मक कारवाईसह थेट जप्तीची कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या ट्रॅव्हल्स, वडाप, काळी-पिवळी टॅक्सी आणि ऑटो रिक्षा चालकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात ५ ते १५ जून या कालावधीत जिल्ह्यातील विविध एसटी स्थानक परिसरात संयुक्त तपासणी मोहीम राबविण्यात आली. या कारवाईत एकूण ३०६ वाहनांवर विविध मोटार वाहन कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली. संबंधित वाहनधारकांकडून ४ लाख रुपयांहून अधिक दंड वसूल करण्यात आला.
या कारवाईचा सकारात्मक परिणाम एसटी महामंडळाच्या उत्पन्नावरही झाल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. अवैध प्रवासी वाहतुकीवर नियंत्रण आल्यामुळे बुलढाणा एसटी विभागाच्या महसुलात तब्बल ७४ लाख रुपयांची वाढ झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे एसटी महामंडळाच्या नियमित प्रवासी सेवेचा लाभ वाढण्यास मदत झाल्याचे प्रशासनाने सांगितले.
पहिल्या टप्प्यातील यशानंतर प्रशासनाने मोहिमेचा दुसरा टप्पा आणखी कठोर केला. १ जुलै ते १० जुलै या कालावधीत अवघ्या दहा दिवसांत २७० वाहनांवर कारवाई करण्यात आली. यात काळी-पिवळी टॅक्सी, खासगी ट्रॅव्हल्स, ऑटो रिक्षा तसेच अन्य नियमबाह्य प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांचा समावेश आहे. या कारवाईदरम्यान लाखो रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असून, अनेक वाहनधारकांना कायद्याचे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
प्रशासनाच्या मते, एसटी स्थानक परिसरात अनधिकृत वाहनांची गर्दी वाढल्यामुळे मुख्य रस्त्यांवर वाहतूक कोंडी निर्माण होत होती. याशिवाय, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांसह अनेक प्रवाशांना त्रास सहन करावा लागत होता. काही ठिकाणी प्रवाशांना जबरदस्तीने खासगी वाहनांमध्ये बसविण्याच्या तक्रारीही समोर आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि एसटी स्थानक परिसर शिस्तबद्ध ठेवण्यासाठी ही मोहीम सुरू करण्यात आली आहे.
पोलीस आणि आरटीओ प्रशासनाने नागरिकांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले असून, एसटी स्थानक परिसरात वाहने उभी न करण्याचे तसेच अधिकृत एसटी सेवेलाच प्राधान्य देण्याचे आवाहन केले आहे. अवैध प्रवासी वाहतूक आणि 'नो पार्किंग' नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधातील संयुक्त मोहीम आगामी काळातही सातत्याने सुरू राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.