शेतकऱ्यांना नडाल तर थेट जेलमध्ये टाकू! सावकार, मायक्रो फायनान्स कंपन्यांना एकनाथ शिंदेंचा सज्जड दम; दुष्काळग्रस्तांच्या मुलींच्या लग्नाची जबाबदारी शिवसेना घेणार!

प्रतापराव जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त मेहकरात दुष्काळग्रस्त शेतकरी संवाद मेळाव्याला प्रचंड गर्दी!
 
मेहकर (बुलढाणा लाइव्ह वृत्तसेवा) : “मीदेखील शेतकऱ्याचा मुलगा आहे. शेतकऱ्यांचे दुःख, त्यांच्या वेदना मला समजतात. आज माझा शेतकरी संकटात आहे. अशा परिस्थितीत त्याला कोणी नडू नये, कर्जवसुलीसाठी तगादा लावू नये. सावकार असो, मायक्रो फायनान्स कंपनी असो की बँक, शेतकऱ्यांना त्रास दिल्यास संबंधितांवर थेट गुन्हे दाखल करून त्यांना जेलमध्ये टाका, अशा सूचना मी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत,” असे सांगत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी कर्जवसुलीसाठी शेतकऱ्यांचा छळ करणाऱ्यांना सज्जड दम दिला. केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त आज, २७ नोव्हेंबर रोजी मेहकर येथे आयोजित दुष्काळग्रस्त शेतकरी संवाद मेळाव्यात ते बोलत होते. या मेळाव्याला जिल्हाभरातून शेतकरी, महिला आणि नागरिकांची प्रचंड गर्दी झाली होती. आपल्या भाषणातून शिंदे यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना धीर देत विविध प्रश्नांवर भूमिका मांडली.

मेळाव्याला येण्यापूर्वी एकनाथ शिंदे यांनी दामोदर इंगळे आणि कमलाबाई इंगळे या शेतकरी दाम्पत्याच्या शेतातील साध्या पत्र्याच्या घराला भेट दिली. या भेटीचा भावनिक किस्साही त्यांनी सभेत सांगितला. “सकाळपासून त्या माऊलीने माझ्यासाठी जेवणाची तयारी केली होती. तिचा आग्रह पाहून मला तिथे जेवल्याशिवाय येता आलं नाही. त्यांच्या शेतात झाडाखाली सतरंजीवर बसून भाकरी, भाजी आणि ठेचा खाल्ला. मीदेखील शेतकऱ्याचा मुलगा आहे. माझ्या आईची तळमळ आणि काटकसर मी पाहिली आहे. माझ्या पत्नीचीही काटकसर पाहिली आहे. त्यामुळे शेतकरी कुटुंबांच्या वेदनांची मला जाणीव आहे,” असे शिंदे म्हणाले. इंगळे कुटुंबातील मुलीने पोलीस होण्याची इच्छा व्यक्त केली, तर मुलगा बीएस्सी ॲग्रीचे शिक्षण घेत आहे. या दोघांच्या शिक्षणासाठी आवश्यक मदत करण्याची जबाबदारी शिवसेना स्वीकारणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

दुष्काळामुळे अनेक शेतकरी कुटुंबांपुढे मुलींच्या लग्नाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. शेताच्या बांधावर गेल्यानंतर शेतकरी ओक्साबोक्शी रडत आपल्या व्यथा सांगत होते. मुलांच्या शिक्षणाची फी कशी भरायची, मुलींची लग्ने कशी करायची, असे प्रश्न त्यांच्यासमोर आहेत. मात्र, शेतकऱ्यांनी धीर सोडू नये. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलींच्या लग्नाची जबाबदारी शिवसेनेने स्वीकारली आहे. प्रत्येक भागात अशा मुलींची माहिती घेऊन थाटामाटात सामूहिक विवाह सोहळे आयोजित करण्याच्या सूचना केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्यासह शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना शिंदे यांनी दिल्या.

शेतकऱ्यांकडून सक्तीची कर्जवसुली करणाऱ्या मायक्रो फायनान्स कंपन्या आणि सावकारांवरही शिंदे यांनी जोरदार प्रहार केला. “काही फायनान्स कंपन्यांनी गुंड पाळले आहेत. शेतकऱ्यांना फोन करून शिवीगाळ केली जाते, दादागिरी केली जाते. ही काय वसुलीची पद्धत आहे? शेतकरी संकटात असताना त्याला त्रास देऊ नका. अन्यथा जेलमध्ये चक्की पिसायला पाठवल्याशिवाय राहणार नाही,” असा इशारा त्यांनी दिला. नांदेडमधील एका शेतकऱ्याच्या मृत्यूच्या घटनेचाही त्यांनी यावेळी उल्लेख केला. शेतकऱ्यांच्या पाठीशी राज्य सरकारसह केंद्र सरकारही ताकदीने उभे राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबतही शिंदे यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले. “कुणी कितीही काही केले तरी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. एकनाथ शिंदे शब्द देताना शंभर वेळा विचार करतो; पण दिलेला शब्द पूर्ण करतो,” असे ते म्हणाले. केंद्र सरकारच्या सहा हजार रुपयांच्या मदतीसोबत राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना आणखी सहा हजार रुपये देण्याचा निर्णय, मुलींचे मोफत उच्च शिक्षण आणि महिलांना एसटी प्रवासात ५० टक्के सवलत यांसारख्या निर्णयांचाही त्यांनी उल्लेख केला. विरोधकांच्या टीकेवर बोलताना, आरोपाला उत्तर आरोपाने आणि टीकेला उत्तर टीकेने देणार नाही, तर आपल्या कामातून उत्तर देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आयोजित या मेळाव्यात दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबांसाठी शिलाई मशीन, विद्यार्थिनींसाठी सायकली, धान्याचे किट यांसह विविध मदत उपक्रमांचा समावेश करण्यात आला. जनावरांसाठी चारा घेऊन जाणाऱ्या वाहनांनाही रवाना करण्यात आले. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, जनावरांसाठी पाणी, चारा आणि आवश्यकतेनुसार चारा छावण्यांची व्यवस्था करण्यात येईल, असे आश्वासन शिंदे यांनी दिले.

“१९७२ नंतर एवढ्या मोठ्या दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. काही गावांमध्ये रोजगारासाठी नागरिकांनी स्थलांतर केले असून घरांना कुलपे लागली आहेत. मात्र, शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये. तुमचं दुःख ते माझं दुःख आणि तुमची समस्या ती माझी समस्या आहे. तुम्ही एकटे नाहीत. तुमच्या पाठीशी सरकार आहे, शिवसेना आहे आणि तुमच्या हक्काचा भाऊ एकनाथ शिंदे आहे. या संकटातून तुम्हाला बाहेर काढण्यासाठी आवश्यक ती मदत करू,” असा शब्द देत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मेहकरच्या मेळाव्यातून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला.