Spot Report : ‘बुलडाणा लाइव्ह’ थेट बांधावर… धाय मोकलून रडला हो शेतकरी..! म्हणाला, या नुकसानीतून सावरू तरी कसं?

बुलडाणा (कृष्णा सपकाळ ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः २७ ची रात्र अन् २८ चा दिवस… शेतकऱ्यांच्या चिरकाल स्मरणात राहतील असे ठरले आहेत. पाऊस क्रूरपणे कोसळत होता, शेतकऱ्यांच्या स्वप्नांवर, उद्याच्या भविष्यावर अक्षरशः वरवंटा फिरवत होता… काढणीला आलेल्या पिकांत आता गुडघाभर पाणी साचले आहे. शेतकरी ते उपसण्याचा प्रयत्न करताहेत, पण पाणीच इतके आहे की उपसून उपसून किती …
 
Spot Report : ‘बुलडाणा लाइव्ह’ थेट बांधावर… धाय मोकलून रडला हो शेतकरी..! म्हणाला, या नुकसानीतून सावरू तरी कसं?

बुलडाणा (कृष्णा सपकाळ ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः २७ ची रात्र अन्‌ २८ चा दिवस… शेतकऱ्यांच्‍या चिरकाल स्मरणात राहतील असे ठरले आहेत. पाऊस क्रूरपणे कोसळत होता, शेतकऱ्यांच्‍या स्वप्नांवर, उद्याच्‍या भविष्यावर अक्षरशः वरवंटा फिरवत होता… काढणीला आलेल्या पिकांत आता गुडघाभर पाणी साचले आहे. शेतकरी ते उपसण्याचा प्रयत्‍न करताहेत, पण पाणीच इतके आहे की उपसून उपसून किती उपसणार?.. गेल्या काही दिवसांत या पावसामुळे आधीच पिके पिवळी पडली होती… त्‍यात अतिवृष्टीने होती नव्‍हती सारी अपेक्षा धुळीस मिळवली… त्‍यामुळे शेतकरी हवालदील आहेत, डोळ्यांत अश्रू आहेत… कुणाच्या खांद्यावर डोकं ठेवून रडावं अन्‌ कुणाकडं आशेने पहावं हेही त्‍यांना कळेनासं झालं आहे… बुलडाणा लाइव्हने आज, २९ सप्‍टेंबरला येळगाव (ता. बुलडाणा) भागातील काही शेतशिवारं गाठली, तेव्‍हा त्‍यांच्‍या डोळ्यांतून अश्रू घळाघळा वाहू लागले… शेतकरी अक्षरशः धाय मोकलून रडला… अन्‌ ते दृश्य असह्य होऊन बुलडाणा लाइव्हच्या टीमलाही अश्रू अनावर झाल्यागत चित्र होतं… पावसानं जिल्हाभर असंच चित्र निर्माण केलं आहे. जिल्ह्यातील सारेच शेतकरी याच संकटात आहेत… आता सरकारने वेळ दवडून, कागदोपत्री खेळ न करता तातडीने पंचनामे हाती घेण्याची आणि थेट मदत देण्याची गरज आहे. जिल्हाच पाण्याखाली गेल्याने अवघा जिल्हा अतिवृष्टीग्रस्‍त घोषित करून पॅकेज जाहीर करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

Spot Report : ‘बुलडाणा लाइव्ह’ थेट बांधावर… धाय मोकलून रडला हो शेतकरी..! म्हणाला, या नुकसानीतून सावरू तरी कसं?

शेतात पुराचं पाणी अजूनही साचलेलं आहे. सोयाबीन, उडीद, तूर या पिकांचं मोठं नुकसान जिल्हाभरात झालं आहे. महापुराने संकटात सापडलेल्या शेतकऱ्याचा संसारही मोडून पडलाय. घरांची पडझड झाली आहे. येळगाव येथील नुकसानग्रस्त भागाचा दौरा केला तेव्‍हा पैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे गावाच्या वेशीपर्यंत पाणी आले होते. नेहमीप्रमाणे दिसणारी वर्दळ आज गावात दिसली नाही. शेतात साचलेले पाणी उपसून टाकण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू होती. मात्र उपसून उपसून किती पाणी उपसणार? शेकडो हेक्टर जमीन खरडली गेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पन्‍नाची आता अपेक्षाच नाही. महत्वाचे पीक असलेले सोयाबीन पूर्णपणे हातातून गेल्याचे शेतकरी सांगत होते. कर्ज काढून केलेला खर्च पूर्णच पाण्यात गेल्याचे शेतकरी सांगत होते. येळगावचे शेषराव धोंडू साळोक (७५) यांनी सव्वा एकर शेतात १५ हजार रुपयांचा खर्च करून सोयाबीनचे पीक घेतले होते.

आठवडाभरात त्यांना ५० हजारांचे उत्‍पन्‍न अपेक्षित होते. मात्र आता केलेला खर्चही पाण्यात गेला. पत्नी, २ मुलं, २ सुना, नातवंड असा ९ जणांचा परिवार चालविण्यासाठी आता मजुरीशिवाय पर्याय नाही हे सांगताना त्यांना अश्रू अनावर झाले होते. त्याच गावातील रतनसिंग शिवसिंग साळोक यांनी ४ एकरांत सोयाबीन पेरली होती. पैकी २ एकर शेतात पूर्णपणे पाणी साचलेलं असल्यानं पीक सडून गेले आहे. त्यांचं ८० हजार रुपयांच नुकसान झालं. श्रीकृष्ण श्यामराव साळोक यांनी ५ एकरात तूर आणि सोयाबीनचं पीक घेतलं होतं. मात्र ते सर्वच आता पाण्याखाली गेलं आहे. साहेबराव भिकाजी साळोक यांच्या पैनगंगेच्या तिरावरील ३ एकर शेतात पूर ओसरल्यानंतरही पाणीच पाणी आहे. दिवठाणा (ता. चिखली) येथील दत्तू सोळंकी यांच्या पैनगंगेच्या तिरावरील १० एकर शेती पूर्णपणे पाण्यात गेली आहे. सरकारने कर्जमाफीपासून वंचित ठेवले. मागील वर्षीची पीक विम्याची रक्कम दिली नाही.आता किमान नुकसान भरपाई तरी लवकर द्यावी, अशी त्यांची मागणी आहे. येळगाव येथील श्याम बाजीराव राजपूत यांची ४ एकर शेती पाण्यात आहे. ते म्हणतात, आता तुम्हीच सांगा कसं जगायचं…?

बातमीचा व्हिडिओ पाहून तुमच्याही डोळ्यांत येतील अश्रू… व्हिडिओ पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा ः https://youtu.be/N5Ar3cigo3M