शिक्षकांशिवाय शिक्षण कसे? आदिवासी विद्यार्थी-पालकांचे जिल्हा परिषदेसमोर ठिय्या आंदोलन; मागणी पूर्ण होईपर्यंत हटणार नाहीत!
भिंगार व चाळीस टाकळी येथील निवासी शाळांमध्ये इयत्ता सहावी ते दहावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आवश्यक त्या प्रमाणात शिक्षक उपलब्ध नाहीत. गेल्या तीन वर्षांपासून शिक्षकांची कमतरता कायम असल्याने विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक नुकसान होत असल्याचा आरोप पालकांनी केला आहे. अनेक विषयांचे नियमित अध्यापन होत नसल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर गंभीर परिणाम होत असून, त्यांच्या भवितव्याशी खेळ सुरू असल्याची भावना आंदोलकांनी व्यक्त केली. यापूर्वी संबंधित अधिकाऱ्यांकडे अनेकदा निवेदने देऊनही शिक्षकांची नियुक्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे अखेर विद्यार्थी, पालक आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी जिल्हा परिषद कार्यालयासमोर ठिय्या आंदोलनाचा मार्ग स्वीकारला. "जोपर्यंत आमची मागणी मान्य होत नाही आणि शाळांना पुरेसे शिक्षक मिळत नाहीत, तोपर्यंत आम्ही येथून उठणार नाही," असा ठाम इशारा आंदोलकांनी प्रशासनाला दिला आहे.