‘जागतिक वारसा’ म्हणून मुख्यमंत्र्यांकडून गौरव, पण लोणार सरोवराचे अस्तित्वच धोक्यात! सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव;

इकडे वाढत्या पाण्यात बुडतोय शेकडो वर्षांचा ऐतिहासिक वारसा! आता तरी सरकारला जाग येणार का?
 
लोणार (सचिन गोलिंच्छा : बुलढाणा लाइव्ह वृत्तसेवा) : जगाच्या नकाशावर महाराष्ट्राची मान अभिमानाने उंचावणारे बुलढाणा जिल्ह्यातील जगप्रसिद्ध लोणार सरोवर पुन्हा एकदा जागतिक स्तरावर चर्चेत आले आहे. इंटरनॅशनल युनियन ऑफ जिऑलॉजिकल सायन्सेस (IUGS) च्या तिसऱ्या १०० जागतिक भूशास्त्रीय वारसा स्थळांच्या यादीत लोणार सरोवराचा समावेश झाल्याने महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील मंत्री, आमदार आणि लोकप्रतिनिधींकडून सोशल मीडियावर अभिनंदनाचा वर्षाव सुरू आहे. मात्र, ज्या सरोवराच्या जागतिक गौरवाचे गोडवे गायले जात आहेत, त्याच सरोवराचे अस्तित्व आज गंभीर संकटात सापडले आहे, हे वास्तव दुर्लक्षित करून चालणार आहे का? सरोवरातील वाढत्या पाण्याखाली शेकडो वर्षांचा ऐतिहासिक वारसा गडप होत असताना आणि सरोवराचे मूळ रासायनिक स्वरूप बदलत असताना केवळ सोशल मीडियावरील अभिनंदनाच्या पोस्टने हा वारसा वाचणार आहे का? असा संतप्त सवाल आता लोणारकरांकडून उपस्थित केला जात आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या अधिकृत फेसबुक खात्यावरून लोणार सरोवराच्या जागतिक मान्यतेबद्दल आनंद व्यक्त केला आहे. महाराष्ट्रासाठी ही अभिमानास्पद बाब असून या गौरवामुळे लोणार सरोवराच्या संवर्धन, संशोधन आणि पर्यटन विकासाला नवी दिशा मिळणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राज्यातील अनेक मंत्री आणि आमदारांनीही या ऐतिहासिक मान्यतेचे स्वागत केले. मात्र, जागतिक स्तरावर गौरव मिळालेल्या या सरोवराच्या संवर्धनासाठी प्रत्यक्षात काय केले जात आहे, हा प्रश्न अनुत्तरितच आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या फेसबुक पोस्टवरही अनेक नागरिकांनी प्रतिक्रिया नोंदवत सरोवराची वाढती पाणीपातळी आणि पाण्याखाली गेलेल्या ऐतिहासिक मंदिरांकडे लक्ष वेधले आहे. एकीकडे जागतिक वारसा म्हणून लोणारचा डंका वाजत असताना दुसरीकडे त्याच वारशाच्या अस्तित्वासाठी स्थानिक नागरिकांना आंदोलन करावे लागत आहे, ही बाब निश्चितच चिंताजनक आहे.

लोणार सरोवराची वाढती पाणीपातळी हा गेल्या काही वर्षांपासून अत्यंत गंभीर प्रश्न बनला आहे. सरोवराच्या काठावर असलेली कलमजा माता मंदिरासह अनेक पुरातन मंदिरे वाढत्या पाण्यामुळे जलमय झाली आहेत. शेकडो वर्षांचा इतिहास सांगणाऱ्या या वास्तूंचे अस्तित्व धोक्यात आले आहे. त्याचबरोबर सरोवरात गोड्या पाण्याचे वाढते मिश्रण होत असल्याने येथील पाण्याच्या पीएच (pH) मूल्यात घट झाल्याची चिंता व्यक्त होत आहे. लोणार सरोवराचे वैशिष्ट्य असलेले क्षारीय पाणी, त्यातील दुर्मीळ सूक्ष्मजीव आणि वैशिष्ट्यपूर्ण जैवविविधतेवर या बदलांचा विपरीत परिणाम होण्याची भीती पर्यावरणप्रेमी व्यक्त करत आहेत. त्यामुळे हा प्रश्न केवळ पाणीपातळी वाढण्यापुरता मर्यादित राहिलेला नसून जागतिक महत्त्वाच्या भूशास्त्रीय आणि पर्यावरणीय वारशाच्या संरक्षणाशी जोडला गेला आहे.

सरोवरातील वाढत्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी लोणारकरांनी आजवर अनेकदा आंदोलनांचा मार्ग स्वीकारला. शहर बंद ठेवण्यात आले, रास्ता रोको आंदोलने झाली, उपोषणे करण्यात आली. मात्र, या आंदोलनांनंतरही सरोवरातील अतिरिक्त पाण्याच्या व्यवस्थापनासाठी ठोस आणि परिणामकारक तांत्रिक उपाययोजना झालेली नसल्याची स्थानिकांची तक्रार आहे. वनविभाग, पुरातत्त्व विभाग आणि महसूल प्रशासन यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे हा प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित असल्याचा आरोपही नागरिकांकडून केला जात आहे. दरम्यान, वाढत्या पाण्याचा प्रश्न सोडवताना सरोवराच्या नैसर्गिक रचनेला, जैवविविधतेला आणि पर्यावरणीय समतोलाला धक्का बसणार नाही, यासाठी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली वैज्ञानिक उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.

जागतिक गौरवाचा आनंद जरूर साजरा व्हावा; पण ज्या वारशाचा गौरव केला जात आहे, तो वारसाच उद्या अस्तित्वात राहिला नाही तर या सन्मानाला अर्थ काय उरणार? असा प्रश्न लोणारकर विचारत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरोवराच्या संवर्धनाला नवी दिशा मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. त्यामुळे आता या आश्वासक शब्दांचे रूपांतर प्रत्यक्ष कृतीत होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. राज्य सरकारने या प्रश्नाची तातडीने दखल घेऊन भूशास्त्रज्ञ, पर्यावरणतज्ज्ञ, जलतज्ज्ञ आणि पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांची संयुक्त समिती स्थापन करावी, वाढत्या पाणीपातळीमागील कारणांचा वैज्ञानिक अभ्यास करावा आणि ऐतिहासिक मंदिरांच्या संरक्षणासाठी कालबद्ध कृती आराखडा तयार करावा, अशी मागणी पुढे येत आहे. कारण लोणार सरोवराला जागतिक मान्यता मिळणे ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब असली, तरी त्या जागतिक वारशाचे अस्तित्व टिकवणे ही सरकारची त्याहून मोठी जबाबदारी आहे. आता प्रश्न एकच आहे, मुख्यमंत्र्यांच्या कौतुकानंतर तरी बुडणाऱ्या लोणार सरोवराला वाचवण्यासाठी सरकार पुढाकार घेणार का?