हिंदुत्ववादी नेतृत्व ॲड.अमोल अंधारे यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अकोल्यात झाला पक्षप्रवेश; खामगाव परिसरात राजकीय हालचालींना वेग...
या पक्षप्रवेश सोहळ्यास खामगाव विधानसभा मतदारसंघाचे पक्ष निरीक्षक माजी आमदार संजय रायमुलकर, शशिकांत खेडेकर, तालुका प्रमुख राजू बघे यांच्यासह तालुक्यातील शेकडो पदाधिकारी, शिवसैनिक व हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. राजराजेश्वर नगरीत झालेल्या या जाहीर प्रवेशामुळे संपूर्ण खामगाव परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
ॲड. अमोल अंधारे हे बालपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक असून, गेल्या तीन दशकांहून अधिक काळ त्यांनी संघ परिवारातील विविध संघटनांमध्ये निष्ठेने कार्य केले आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, बजरंग दल व विश्व हिंदू परिषद या संघटनांमध्ये शाखा संयोजक ते प्रांत सहमंत्री (विदर्भ) अशा विविध जबाबदाऱ्या त्यांनी यशस्वीरीत्या पार पाडल्या आहेत. तसेच खामगाव नगरीचा ‘गौरव पुरस्कार’ प्राप्त हनुमान व्यायाम मंडळाचे ते सध्या सचिव म्हणून कार्यरत आहेत.
नुकतेच त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील योगदानाबद्दल प्रेस क्लब खामगावतर्फे “जिल्हा गौरव” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. हिंदुत्व, राष्ट्रभक्ती आणि सामान्य कार्यकर्त्यांच्या न्यायासाठी सातत्याने संघर्ष करणारे नेतृत्व म्हणून त्यांची संपूर्ण विदर्भात ओळख आहे.
पक्षप्रवेशावेळी ॲड. अमोल अंधारे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांचे मनःपूर्वक आभार मानले. तसेच खामगाव तालुक्यातील घाटाखालच्या संपूर्ण परिसरातील सुमारे ५१०० हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्या शिवसेना प्रवेशासाठी खामगाव येथे भव्य जाहीर सभा आयोजित करण्याची मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अमोल अंधारे यांच्या पाठीवर आशिर्वादाचा हात ठेवत, “लवकरच येतो, कामाला लागा,” असे आश्वासन दिले.
ॲड. अमोल अंधारे यांच्या शिवसेना प्रवेशामुळे आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या संघटनात्मक बळात मोठी वाढ होणार असल्याचे मत राजकीय जाणकारांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
