सिंदखेड राजा, देऊळगाव राजा तालुक्यात अतिवृष्टी; आसाेला जहागीर गावात घरांमध्ये शिरले पाणी; आमखेड येथील धरण शंभर टक्के भरले; सवडत ते बेंदरखेड रस्त्यावरील पूल गेला वाहून..!

 
सिंदखेड राजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : गत दाेन दिवसांपासून सिंदखेड राजा आणि देऊळगाव राजा जाेरदार पाउस हाेत आहे. सततच्या पावसाने आमखेड येथील धरण १०० टक्के भरले आहे. त्यामुळे, आणखी पाउस आल्यास या धरणातून विसर्ग सुरू हाेणार आहे. देऊळगाव राजा तालुक्यातील आसाेला जहागीर गावात अतिवृष्टीसदृश्य पावसामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरले आहे. या पावसामुळे नदी, नाल्यांच्या काठावरील पिकांचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. प्रशासनाने नुकसानीचे पंचनामे करून मदत देण्याची मागणी हाेत आहे. 
सिंदखेड राजा आणि देऊळगाव राजा तालुक्यात गत काही दिवसांपासून जाेरदार पाउस सुरू आहे. ८ ऑगस्ट राेजी सायंकाळपासून दाेन्ही तालुक्यातील अनेक गावांमध्ये जाेरदार पाऊस झाला आहे. अतिवृष्टीसदृश्य पावसामुळे पिकांचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नदी आणि नाल्यांच्या काठावरील पिके खरडून गेली आहेत.त्यामुळे, आधीच विविध संकटांनी त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांवर आणखी एक संकट आले आहे. 

खडकपूर्णा प्रकल्पात ७२ टक्के जलसाठा, नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा जिल्ह्यातील सर्वात माेठा प्रकल्प असलेल्या खडकपूर्णा प्रकल्पात ७२ टक्के जलसाठा आहे. तसेच प्रकल्पाच्या क्षेत्रात पाउस हाेत असल्याने धरणातील जलसाठ्यात वाढ हाेत आहे. प्रकल्पात पाण्याची आवक वाढल्यास विसर्ग करण्यात येणार आहे. त्यामुळे, खडकपूर्णा नदीच्या काठावरील ३३ गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.