गणेशोत्सवासाठी जिल्ह्यात तगडा पोलीस बंदोबस्त; २०० अधिकारी, २५०० पाेलीस तैनात; पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांची माहिती; १३०० हाेमगार्डही राहणार तैनात..!

 
बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : शहरासह जिल्ह्यात २७ ऑगस्ट राेजी बाप्पांचे आगमण झाले आहे. गणेशाेत्सवादरम्यान कुठलीही अनुचीत घटना घडू नये यासाठी २७ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर या कालावधीत तगडा बंदाेबस्त तैनात करण्यात आला आहे. यामध्ये २०० पाेलीस अधिकाऱ्यांसह २५०० पाेलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहे. तसेच १३०० हाेमगार्ड, दंगा काबू पथके सात, शिघ्र कृती दल एक आणि एसआरपीएफच्या चार प्लाटून तैनात करण्यात आल्या आहेत अशी माहिती जिल्हा पाेलीस अधीक्षक नीलेश तांबे यांनी दिली आहे.
श्री.गणेशोत्सव निर्विघ्न पार पडावा यासाठी भारतीय नागरीक सुरक्षा संहिता (BNSS) कलम 126, 127 आणि 129 अंतर्गत 1069 जणांवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे. तर कलम 163(2) नुसार 1435 जणांवर हद्दपारीची कारवाई सुरू आहे.

सोशल मिडीयावर पसरवणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जाणार आहे. नागरिकांनी कोणत्याही खोट्या किंवा भडकावू संदेशांना बळी पडू नये, अशा पोस्ट्स फॉरवर्ड करू नयेत आणि सत्यता पडताळूनच माहिती शेअर करावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

मंडळांना व नागरिकांना मार्गदर्शन

गर्दीच्या ठिकाणी लहान मुले, मौल्यवान वस्तू, मोबाईल यांची काळजी घ्यावी, वाहन पार्किंग करताना वाहतुकीत अडथळा होणार नाही याची खबरदारी घ्यावी, संशयास्पद हालचाली दिसल्यास 112 या टोल फ्री क्रमांकावर त्वरित कळवावे अशा सुचना करण्यात आल्या आहेत. 

गणेशोत्सव राज्य उत्सव

यावर्षी गणेशोत्सव हा राज्य उत्सव म्हणून घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व मंडळांनी परवानगीतील नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. मंडाळांनी ध्वनी मर्यादांचे पालन करावे, मिरवणुकीदरम्यान लेझर लाईट व रसायनयुक्त गुलालाचा वापर टाळावा , देखाव्यात गर्दी टाळण्यासाठी योग्य नियोजन करावे, असे आवाहनही पाेलिसांनी केले आहे. 
नागरिकांनी सहकार्य करावे 
“गणेशोत्सव आनंद, उत्साह आणि शांततेत साजरा करण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे,” असे आवाहन पोलीस अधीक्षक  निलेश तांबे यांनी केले आहे.