आळंदीकडे निघालात? एकदा ही बातमी वाचाच; अचानक करण्यात आले 'थांबा'चे आवाहन, नेमकं घडलंय तरी काय?
यंदाच्या आषाढी वारीसाठी श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे प्रस्थान मंगळवार, ८ जुलै रोजी दुपारी ३ वाजता श्रीक्षेत्र आळंदी येथून होणार आहे. मात्र, त्यापूर्वीच इंद्रायणी नदीला आलेल्या मोठ्या पुरामुळे आळंदीतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. नदीवरील चारही महत्त्वाचे पुल पाण्याखाली गेल्याने शहरातील वाहतूक ठप्प झाली असून, प्रवेश करणे धोकादायक ठरत आहे.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळाचे अध्यक्ष तथा विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती, पंढरपूरचे सदस्य प्रकाश महाराज जवंजाळ यांनी वारकरी आणि भाविकांना संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे. "ज्यांनी आळंदीकडे प्रवास सुरू केला आहे त्यांनी ज्या ठिकाणी आहात, तेथेच सुरक्षित थांबा. सध्या आळंदीमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करू नका," असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
प्रकाश महाराज जवंजाळ यांनी पुढे सांगितले की, प्रशासन, पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन विभाग परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, अफवांवर विश्वास ठेवू नये आणि नदीपात्र तसेच घाट परिसरात जाणे टाळावे. परिस्थिती सामान्य होताच पुढील सूचना दिल्या जातील.
सध्या प्रशासनाकडून आवश्यक त्या सर्व उपाययोजना सुरू असून, वारकरी व भाविकांनी सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत संयम राखावा आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही प्रकाश महाराज जवंजाळ यांनी केले आहे.