समरसता हा भाषणाचा नाही तर आचरणाचा विषय! विदर्भ प्रांत संघचालक दिपकजी तामशेट्टीवार यांचे प्रतिपादन! अंचरवाडी येथे विशाल हिंदु संमेलन उत्साहात! कुटुंबव्यवस्था टिकली तर संस्कृती जिवंत राहील..
पुढे बोलतांना तामशेट्टीवार म्हणाले की, हिंदु समाजाच्या संघटनेसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम सुरू आहे. गेल्या १०० वर्षांपासून व्यक्ती निर्माणाचे काम संघाने हाती घेतले आहे. आपल्या भारत मातेला पुनश्च एकदा गतवैभव प्राप्त करून द्यायचे असेल तर माणसं घडली पाहिजेत, हे कामं कुणी दुसरं येऊन करणार नाही ते आपल्यालाच करावे लागणार आहे. स्मशानात,मंदिरात सर्वांना प्रवेश. कोणताही भेदभाव न करता जलसाठा सर्वांसाठी एक अशी समरसता प्रत्यक्ष व्यवहारात जगण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. एकत्र कुटुंब पद्धती , कौटुंबिक संस्कार महत्वाचे आहेत. कुटुंबव्यवस्था टिकली, नाती टिकली तर संस्कृती जिवंत राहील असेही तामशेट्टीवार म्हणाले. आपले गाव स्वच्छ, देश स्वच्छ रहावा यासाठी पर्यावरण पूरक जीवन पद्धती आवश्यक आहे,प्लास्टिकचा वापर टाळावा. झाडांचे संगोपन करावे, पाण्याचे संवर्धन करावे असेही ते म्हणाले. देशाला आत्मनिर्भर बनवण्यासाठी स्वदेशी वस्तूंचा अधिकाधिक वापर करावा जेणेकरून आपल्या माणसांना रोजगार उपलब्ध होईल असेही ते म्हणाले. याशिवाय आपल्या हक्कांसाठी लढताना देशाप्रती आपली कर्तव्य काय आहेत याचेही भान असावे. संविधान, राष्ट्रगीत, राष्ट्रगान याचा सन्मान ठेवावा असे दिपक तामशेट्टीवार म्हणाले.
हिंदू म्हणून अभिमानाने जगा: स्वामी जगदीशचैतन्यजी
हा देश हिंदूंचा आहे. हिंदूंच्या पराक्रमाच्या भरवशावरच अनेक आक्रमणे या देशाने उलटवून लावली आहेत. इथल्या संस्कृतीवर आक्रमण झाले, इथल्या भूमीवर आक्रमण झाले मात्र आपल्या पूर्वजांनी संघर्ष करून ही आक्रमणे उलटवून लावली. साधू संतांच्या त्यागातून आणि अनेकांच्या बलिदानातून हा देश उभा राहिला आहे याची जाणीव आपण ठेवली पाहिजे. काहींना हिंदू म्हणून जगण्याची लाज वाटते मात्र हिंदू म्हणून अभिमानाने जगा असे आवाहन स्वामी जगदीशचैतन्यजी महाराज यांनी केले. हभप चेतनाताई गाडेकर यांनी देशाच्या उभारणीत नारीशक्तीचे महत्त्वाचे योगदान असल्याचे प्रतिपादन केले. दरम्यान कार्यक्रमाच्या आधी अंचरवाडी गावातून भव्य मिरवणूक निघाली.विविध गावातून आलेल्या वारकऱ्यांच्या दिंड्या, बंजारा नृत्य, घोड्यांवर निघालेली छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणा प्रताप यांची मिरवणूक, राम लक्ष्मणाची वेशभूषा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली. कार्यक्रमाची प्रास्ताविक विलास परिहार, सूत्रसंचालन परमेश्वर परिहार तर आभार प्रदर्शन अजय खानझोडे यांनी मानले.