ग्रामपंचायत निवडणुकांची चाहूल; प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर, नागरिकांना हरकतींची संधी
प्रारूप प्रभाग रचनेची प्रक्रिया सुरू
तहसीलदारांकडून गुगल अर्थ नकाशे सुपरइम्पोज करून प्रत्येक गावाचा नकाशा २० फेब्रुवारी २०२६ पर्यंत अंतिम केला जाणार आहे. त्यानंतर तलाठी व ग्रामसेवक यांच्या संयुक्त स्थळ पाहणीद्वारे २७ फेब्रुवारीपर्यंत प्रभाग पाडणे व सीमा निश्चितीची कार्यवाही होईल.
तहसीलदारांच्या अध्यक्षतेखालील समितीमार्फत ५ मार्चपर्यंत प्रारूप प्रभाग रचनेची तपासणी करण्यात येऊन ११ मार्चपर्यंत प्रस्ताव उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवला जाणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाची मान्यता निर्णायक
जिल्हाधिकारी नमुना ‘ब’ ची तपासणी करून आवश्यक दुरुस्त्यांसह १७ मार्चपर्यंत प्रस्ताव राज्य निवडणूक आयोग यांच्याकडे सादर करतील. आयोगाची मान्यता २३ मार्चपर्यंत अपेक्षित असून ३० मार्चपर्यंत अंतिम स्वाक्षरीची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. या टप्प्यानंतर स्थानिक राजकीय समीकरणे स्पष्ट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
हरकती-सूचनांसाठी नागरिकांना संधी
प्रारूप प्रभाग रचनेला ७ एप्रिलपर्यंत व्यापक प्रसिद्धी देऊन हरकती व सूचना मागविण्यात येणार आहेत. हरकती सादर करण्याची अंतिम मुदत १३ एप्रिल असून २१ एप्रिल रोजी सुनावणी घेण्यात येईल. त्यानंतर २३ एप्रिलपर्यंत अभिप्रायासह प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला जाईल.
मे महिन्यात अंतिम प्रभाग रचना जाहीर
उपविभागीय अधिकाऱ्यांकडून प्राप्त प्रस्तावांची तपासणी करून जिल्हाधिकारी २८ एप्रिलपर्यंत अंतिम प्रभाग रचना निश्चित करतील. आयोगाच्या मान्यतेनंतर ४ मे २०२६ रोजी नमुना ‘अ’ मध्ये अंतिम प्रभाग रचनेला व्यापक प्रसिद्धी दिली जाणार आहे.
“जानेवारी ते डिसेंबर २०२६ मध्ये मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने स्थापन होणाऱ्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी,” असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.