गौरवास्पद! बुलढाणा जिल्ह्याच्या सुपुत्राची जागतिक विज्ञानविश्वात उत्तुंग झेप; भल्या भल्या शास्त्रज्ञांना जे जमलं नाही, ते कोलाऱ्याच्या "निधीश" ने करून दाखवलं!
पुण्यातील ऐतिहासिक न्यू इंग्लिश स्कूल मध्ये सातवीत शिक्षण घेणाऱ्या निधीश सोळंकी आणि अर्णव खापर्डे या बालशास्त्रज्ञांनी भौतिकशास्त्रातील अत्यंत क्लिष्ट आणि अद्याप पूर्णपणे न सुटलेल्या 'क्वांटम ग्रॅव्हिटी' या समस्येवर संशोधन करत एक नवा दृष्टिकोन मांडला आहे. त्यांचा 'टाइम रेझिस्टन्स थिअरी' हा सिद्धांत युरोपमधील प्रतिष्ठित संशोधन व्यासपीठ 'झेनोडो' तसेच 'इंटरनॅशनल जर्नल फॉर मल्टीडिसिप्लिनरी रिसर्च' मध्ये प्रकाशित झाला आहे.
जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाइन यांनी मांडलेला 'सामान्य सापेक्षता' (General Relativity) सिद्धांत हा आधुनिक भौतिकशास्त्राचा पाया मानला जातो. मात्र, गुरुत्वाकर्षण आणि क्वांटम यांत्रिकी या दोन मूलभूत सिद्धांतांचा मेळ घालणारी 'क्वांटम ग्रॅव्हिटी' ही समस्या आजही विज्ञानातील सर्वात मोठ्या अनुत्तरित प्रश्नांपैकी एक मानली जाते. याच समस्येकडे निधीश आणि अर्णव यांनी आपल्या संशोधनातून नव्या पद्धतीने पाहण्याचा प्रयत्न केला आहे.
या संशोधनाची आंतरराष्ट्रीय स्तरावर नोंद घेतली गेल्याने भारताच्या वैज्ञानिक क्षेत्रासाठीही ही अभिमानाची बाब मानली जात आहे. विशेष म्हणजे, भौतिकशास्त्रातील इतक्या गुंतागुंतीच्या विषयावर एवढ्या लहान वयात संशोधन करून या दोघांनी जगाचे लक्ष वेधले आहे.
निधीश सोळंकी हा बुलढाणा जिल्ह्यातील श्री सिद्धेश्वर भगवंताची पावन नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोलारा गावचा मूळ रहिवासी आहे. तो कोलारा येथील उद्योजक तथा निकोस प्रा. लिमिटेडचे संचालक वसंत सोळंकी आणि डॉ. कविता सोळंकी यांचा सुपुत्र आहे. ग्रामीण भागातून शिक्षणाची सुरुवात करून थेट जागतिक संशोधन व्यासपीठावर पोहोचलेली त्याची ही झेप बुलढाणा जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाची ठरत आहे.
निधीश आणि अर्णव यांच्या या उल्लेखनीय कामगिरीचे वैज्ञानिक क्षेत्र, शैक्षणिक संस्था तसेच बुलढाणा जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात स्वागत होत असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. वयाच्या अवघ्या १२-१३ व्या वर्षी केलेले हे संशोधन भविष्यात भारताला जागतिक दर्जाचे शास्त्रज्ञ मिळण्याची आशादायी नांदी मानले जात आहे.