पाचपैकी चार वर्गखाेल्या शिकस्त; जीव मुठीत घेवून शिक्षण घेतात विद्यार्थी; लाेणार तालुक्यातील तांबाेळा येथील प्रकार; पालकांचे गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन ..!

 
लाेणार (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या घटण्यामागे भाैतिक सुविधांचा अभाव आणि शिक्षकांची रिक्त पदे ही कारणे आहेत. लाेणार तालुक्यातील तांबाेळा येथील जिल्हा परिषद शाळेतील पाच पैकी चार वर्गखाेल्या शिकस्त झाल्या आहेत. त्या केव्हाही काेसळू शकतात. त्यामुळे, विद्यार्थी जीव मुठीत घेवून शिक्षण घेत आहेत. या वर्गखाेल्या तातडीने पाडून नविन खाेल्यांचे बांधकाम सुरू करावे, तसेच भाैतिक सुविधा उपलब्ध करण्याची मागणी पालकांनी लाेणार पंचायत समितीच्या गट विकास अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. 
लाेणार तालुक्यातील तांबाेळा येथे वर्ग १ ते ५ पर्यंत जिल्हा परिषदेची शाळा आहे. या शाळेत पाच वर्गखाेल्या आहेत. त्यापैकी चार वर्ग खाेल्या शिकस्त झाल्या आहेत. परिसरात अतिवृष्टी झाल्यास या खाेल्या काेसळू शकतात. त्यामुळे, विद्यार्थ्यांच्या जीवीतास धाेका निर्माण झाला आहे. त्यामुळे,या खाेल्या पाडून नविन वर्ग खाेल्यांचे बांधकाम करावे, शाळेच्या वाॅल कंपाउडची उंची वाढवून द्यावी, विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे, शाळेच्या आवारातील धाेकादायक विहीर बुजवण्यात यावी, शाळेला तीन एलएडी टीव्ही संच पुरवावेत, शाळेतील किचन शेडची दुरुस्ती करावी, शाळेतील वर्गखाेल्यांचे विद्युतीकरण करावे, आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. निवेदनावर पालकांची स्वाक्षरी आहे.