जि.प.चे साडेचार हजार कर्मचारी पूरग्रस्तांसाठी देणार एक दिवसाचे वेतन..!

 
बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : अतिवृष्टी व पुरामुळे राज्यभरातील शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. शेतकरी व आपद्ग्रस्तांना सावरण्यासाठी हजारो कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे. राज्य शासनाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियनच्या बुलढाणा जिल्ह्यातील तब्बल ४,५०० कर्मचाऱ्यांनी आपले एक दिवसाचे वेतन पूरग्रस्तांसाठी देण्याचा निर्णय घेतला आहे.
 राज्य शासनाच्या आदेशानुसार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांनी आवाहन केले होते. त्यानुसार युनियनच्या कर्मचाऱ्यांनी शासनाला एक दिवसाचे वेतन कपातीसाठी कळविले असून, याबाबतचे विनंतीपत्र मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सादर करण्यात आले आहे.

अलीकडील दोन महिन्यांपासून झालेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे विविध ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली. शेतांमध्ये पाणी साचून पिकांचे प्रचंड नुकसान झाले, शेतजमिनी खरडून गेल्या, अनेक गावांना पुराचा वेढा बसला. यामुळे मनुष्यहानीसह गुरेढोरे वाचली नाहीत, तर घरगुती साहित्य वाहून गेले. शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांवर ओढवलेल्या या संकटात सामाजिक बांधिलकीतून जिल्हा परिषद कर्मचारी युनियनने मदतीचा हात पुढे केला आहे.

या उपक्रमात संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष विजय तांदुळकर, जिल्हाध्यक्ष राजेश वाइंदेशकर, सरचिटणीस प्रदीप सपकाळ, सचिव अनिल सुसर, विभागीय संघटक प्रवीण गिते, जिल्हा संपर्कप्रमुख विजया सोनुने, महिला आघाडी उपाध्यक्ष पी. एस. गायकवाड, सरचिटणीस अश्विनी मेटकर, जयमाला राठोड, राहुल कासारे, एम. पी. सोनुने, प्रमोद डांगे, अनिल पवार, सुनील लोखंडे आदी पदाधिकाऱ्यांनी सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने एक दिवसाच्या वेतन कपातीचे निवेदन सादर केले आहे.