Follow-up जीव तो जीव असतो, मग तो दोन दिवसांचा असो की मोठ्या व्यक्तीचा! त्या निष्पाप चिमुकलीच्या मृत्यूचे गूढ उकलणार कधी? घटनेला चार दिवस उलटले, तपासाचे पुढे काय?
१५ नोव्हेंबरच्या सायंकाळी चार वाजेच्या सुमारास धाड नाका परिसरातील तलावाच्या काठावर एका वायरच्या थैलीत नवजात अर्भकाचा मृतदेह आढळला होता. घटनेची माहिती मिळताच बुलढाणा शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. फॉरेन्सिक पथक आणि श्वानपथकालाही पाचारण करण्यात आले. त्यानंतर बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक ११३०/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ९४ नुसार अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस फौजदार नामदेव खवले यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. मात्र, केवळ गुन्हा दाखल करणे म्हणजे तपास पूर्ण झाला असे होत नाही. चार दिवसांत पोलिसांनी नेमके कोणते धागेदोरे शोधले? मृत अर्भकाची ओळख पटविण्यासाठी कोणते प्रयत्न झाले? मृत्यूचे कारण स्पष्ट झाले का? या प्रश्नांची उत्तरे जनतेसमोर येणे आवश्यक आहे.
शहरातील प्रसूतिगृहांची तपासणी झाली का? चार-पाच दिवसांत किती बालकांचा जन्म झाला?
या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी पोलिसांसमोर तपासाच्या अनेक दिशा उपलब्ध आहेत. बुलढाणा शहरात शासकीय रुग्णालयासह किती खासगी प्रसूतिगृहे आहेत? घटनेच्या आधीच्या चार ते पाच दिवसांत या रुग्णालयांमध्ये किती प्रसूती झाल्या? किती बालकांचा जन्म झाला? त्यापैकी नवजात बालकांच्या मृत्यूच्या काही नोंदी आहेत का? या सर्व बाबींची कायदेशीर प्रक्रियेनुसार तपासणी होणे आवश्यक आहे. एवढेच नव्हे तर शहरासह आसपासच्या परिसरातील रुग्णालये, आरोग्य केंद्रे आणि संबंधित आरोग्य यंत्रणांकडूनही आवश्यक माहिती घेता येऊ शकते. अर्थात, संबंधित चिमुकलीचा जन्म रुग्णालयातच झाला असे गृहीत धरता येणार नाही. त्यामुळे घरगुती प्रसूतीसह इतर शक्यतांचाही तपास होणे गरजेचे आहे.
सीसीटीव्ही फुटेज तपासले का? थैली घेऊन तलावाकडे कोण आले होते?
धाड नाका परिसरातील टीबी तलावाकडे येणारे रस्ते, आसपासची दुकाने, आस्थापना आणि उपलब्ध सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यात आले का? घटनेच्या आधीच्या काही तासांत अथवा दिवसांत संशयास्पद हालचाली आढळल्या का? एखादी व्यक्ती दुचाकी किंवा चारचाकी वाहनातून तलाव परिसरात आली होती का? मृतदेह आढळलेल्या थैलीवरून काही पुरावे मिळाले का? हे सर्व तपासाचे महत्त्वाचे मुद्दे आहेत. सीसीटीव्ही फुटेज वेळेत सुरक्षित केले नाही तर काही ठिकाणी ते आपोआप नष्ट होण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा प्रकरणात प्रत्येक तास महत्त्वाचा ठरतो. पोलिसांनी या दिशेने कोणती पावले उचलली, हे स्पष्ट होणे गरजेचे आहे.
ठाणेदार संग्राम पाटील साहेब, 'अशाही' प्रकरणात स्वतः लक्ष घालण्याची गरज आहे!
बुलढाणा शहराचे ठाणेदार संग्राम पाटील यांनी या प्रकरणात स्वतः लक्ष घालण्याची गरज आहे. कारण हा केवळ बेवारस मृतदेह सापडल्याचा विषय नाही. एका नवजात जीवाची ओळख, त्याच्या मृत्यूचे कारण आणि मृतदेहाची अशा पद्धतीने विल्हेवाट लावण्यामागील सत्य शोधण्याचा हा विषय आहे. मोठ्या गुन्ह्यांचा तपास जितक्या गांभीर्याने होतो, तितक्याच संवेदनशीलतेने या प्रकरणाकडेही पाहिले पाहिजे. त्या चिमुकलीसाठी पोलीस ठाण्यात तक्रार घेऊन येणारे कुणी नसले, तिच्यासाठी आंदोलन करणारे कुणी नसले, तरी तिच्या मृत्यूमागचे सत्य शोधण्याची जबाबदारी कमी होत नाही.
या प्रकरणात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे नवजात अर्भकाचा मृत्यू नेमका कधी आणि कोणत्या कारणाने झाला? जन्मानंतर मृत्यू झाला की अन्य काही परिस्थिती होती? शवविच्छेदन आणि न्यायवैद्यक तपासणीतून याबाबत महत्त्वाची माहिती मिळू शकते. मृतदेहाची विल्हेवाट लावणारी व्यक्ती आणि जन्मदाते एकच आहेत का, हेदेखील तपासातूनच स्पष्ट होणार आहे.
त्या चिमुकलीचा आवाज बनणार कोण?
अवघ्या दोन दिवसांच्या त्या निष्पाप जीवाला स्वतःचे नावही सांगता आले नाही. तिच्या मृत्यूचे कारण सांगायला ती आज या जगात नाही. तिच्यासाठी न्याय मागणारा कुणी समोर आलेला नाही. पण म्हणून तिच्या मृत्यूचे गूढ कायमचे अनुत्तरित राहता कामा नये. बुलढाणा शहर पोलिसांनी या प्रकरणाचा प्राधान्याने तपास करून सत्य समोर आणावे, हीच अपेक्षा आहे.
त्यामुळे ठाणेदारांसह तपास यंत्रणेला थेट सवाल हाच की— चार दिवसांत तपास कुठपर्यंत पोहोचला? त्या चिमुकलीची ओळख पटविण्यासाठी नेमके काय केले? तिचा मृतदेह तलावाच्या काठावर आणून टाकणाऱ्यापर्यंत पोलीस कधी पोहोचणार? कारण त्या चिमुकलीला न्याय मागता येणार नाही, पण तिला न्याय मिळवून देण्यासाठी यंत्रणेने प्रयत्न करणे आवश्यक आहे. जीव तो जीव असतो... तो दोन दिवसांचा असो की पन्नास वर्षांचा!