अखेर मायेचा विजय! मादी बिबट्या व पिल्लाची हृदयस्पर्शी भेट; पिल्लू घेऊन बिबट्या पसार, क्षण कॅमेऱ्यात कैद
दुधा–कळंबेश्वर रोडवरील कळंबेश्वर येथील एका शेतकऱ्याच्या गोठ्यातून बुधवारी सकाळी बिबट्याने दोन पिल्ले तोंडात धरून नेत असल्याचे शेतकऱ्यांनी पाहिले होते. त्यानंतर परिसरात शोध घेतला असता एक पिल्लू गोठ्यातच आढळून आले. सदर पिल्लू तात्काळ वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले होते.
मादी बिबट्या आपल्या पिलासाठी परत येईल, या शक्यतेने वनविभागाची रेस्क्यू टीम सज्ज होती. घटनास्थळी ट्रॅप व कॅमेरे लावून संपूर्ण परिसरावर लक्ष ठेवण्यात येत होते. अखेर आई–पिल्लाची भेट घडून आली आणि मादी बिबट्या पिल्लाला घेऊन सुरक्षितपणे जंगलाच्या दिशेने निघून गेली.
या संपूर्ण कारवाईत घाटबोरी वनपरिक्षेत्र अधिकारी अंकुश येवले, वडाळी बिटचे वनरक्षक शिवनारायण पडघान, पाचदेवळा बिटचे वनरक्षक उल्हास भोंडणे, संदीप मडावी तसेच बुलढाणा येथील रेस्क्यू टीममधील प्रवीण सोनवणे व पवन वाघ सहभागी होते. वनविभागाने नागरिकांना परिसरात सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
