हुमनी अळीमुळे शेतकऱ्यांनी उभ्या पिकावर फिरवला राेटावेटर; आधीच वाढती महागाई, बियाणे आणि खतांचे वाढते भाव त्यामुळे शेतकरी संकटात असताना हुमणी अळीचे संकट..!

 
चिखली(ऋषी भोपळे : बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) साेयाबीनचे पिक ऐन बहरले असताना हुमनी अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे, महागडे बियाणे आणि खते टाकल्यानंतर शेतकऱ्यांना उभ्या साेयाबीनच्या पिकावर राेटावेटर फिरवावे लागत आहे. त्यामुळे देऊळगाव घुबे, मेरा बु., कोनड खुर्द आदी परिसरातील शेतकरी संकटात सापडले आहेत. 

अनेक शेतांमध्ये सोयाबीन कोळपिणी किंवा उगम अवस्थेत असून अळीने मुळे आणि खोड खाऊन झाड नष्ट करत आहेत. त्यामुळे, उत्पादनात माेठी घट हाेण्याची शक्यता आहे. काही शेतकऱ्यांनी साेयाबीनचे उत्पादन हाेणार नसल्याने उभ्या पिकावर राेटावेटर फिरवले आहे. हुमनी अळी नियंत्रणासाठी शेतकऱ्यांकडून महागडी औषधफवारणी केली जात आहे. मात्र, अपेक्षित परिणाम न मिळाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.कृषी विभागाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे तसेच नुकसानग्रस्तांना मदत देण्याची मागणी दत्तात्रय घुबे, दत्ता राऊत, दिपक जावळे यांच्यासह इतर शेतकऱ्यांनी केली आहे.