शेतकऱ्यांनो गव्हाचे काड पेटवतांना जरा जपून! वडगाव तेजन मध्ये अडीच एकराची आंब्याची बाग जळून खाक...

 
लोणार(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): गव्हाची काढणी केल्यानंतर नांगरणीच्या आधी शेतकरी गव्हाचे काड पेटवून देतात. मात्र गव्हाचे काड पेटवण्याआधी काळजी घेतली पाहिजे. आजूबाजूच्या शेतकऱ्यांना याची पूर्व –सूचना दिली पाहिजे. पेटलेली आग दुसरीकडे जाणार नाही यासाठी काळजी घेतली पाहिजे, कुणाच्या शेतात पाईप स्प्रिंकलर किंवा इतर शेती उपयोगी साहित्य असते ते या आगीत जळून जाण्याची शक्यता असते, अशा अनेक घटना अलीकडच्या काळात घडल्या आहेत. दरम्यान लोणार तालुक्यातील वडगाव तेजन गावात गव्हाच्या काडाला आग लागल्यानंतर अनर्थ घडला. एका शेतकऱ्याची तब्बल अडीच एकराची आंब्याची बाग जळून खाक झाली.
प्राप्त माहितीनुसार घटना काल,३० मार्चच्या सायंकाळची आहे. सायंकाळी सदाशिव चौगुले यांच्या शेतातील गव्हाच्या काडाला आग लावण्यात आली. मात्र सायंकाळी सुकलेल्या अवकाळी वाऱ्या वावधनामुळे ही आग सत्यनारायण तेजनकर यांच्या आंब्याच्या शेतात घुसली. आंब्याच्या बागेतही आंतरपीक म्हणून गहू घेतला होता, त्या गव्हाचे काड आंब्याच्या बागेत होते. त्यामुळे आंब्याच्या बागेने काही मिनिटात पेट घेतला..या आगीने शेतातील संपूर्ण झाडे फळांसह होरपळून जळून गेली. या आगीत फिनोलेक्स कंपनीची ड्रिप सुविधा देखील जळून खाक झाली. या घटनेमुळे शेतकऱ्यावर फार मोठा आघात झाला आहे.. रात्रंदिवस मेहनत करून ही बाग फुलवली होती.. पुढील काही दिवसात या बागेतून आंब्याचे उत्पादन होणार होते, मात्र आता या स्वप्नांची राखरांगोळी झाली असून जवळपास १५ लाखांचे नुकसान झाले आहे. पीडित शेतकऱ्याला तात्काळ मदत देण्याची मागणी जनमानसातून समोर येत आहे.