अतिवृष्टीमुळे शेतकरी व नागरिक संकटात; तातडीने आर्थिक मदतीची गरज – ॲड. जयश्री शेळके; चिखलीतील नुकसानीची केली पाहणी; नागरिकांशी संवाद साधून जाणून घेतल्या अडचणी..!

 
बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : चार दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे चिखली, मेहकर आणि सिंदखेडराजा तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर शेती तसेच घरांचे प्रचंड नुकसान झाले आहे. सततच्या पावसामुळे खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस, उडीद, मूग, मका आणि तूर यांसारखी पिके पाण्याखाली आली आहेत. शेतात पाणी साचल्यामुळे मुळे कुजली असून पुन्हा पेरणी करणे अशक्य झाले आहे.या पावसामुळे शेकऱ्यासोबतच नागरिकांचे मोठे नुकसान झाल्याने तातडीने मदत देण्याची गरज आहे,अशी मागणी जयश्री शेळके यांनी केली.चिखलीत नुकसानाची पाहणी केल्यानंतर त्यांनी नुकसानग्रस्त नागरिकांशी संवाद साधला.तसेच त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
अनेक शेतकऱ्यांनी कर्ज काढून पेरण्या केल्या होत्या. काहींना दुबार पेरणी करावी लागली होती. त्यातच हुमनी अळीच्या प्रादुर्भावामुळे मोठे नुकसान सहन करावे लागले. आता अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या प्रवक्त्या ॲड. जयश्री शेळके यांनी शासनाकडे तातडीने सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई जाहीर करण्याची मागणी केली आहे.

चिखली शहरातील माळीपुरा परिसर नदीकाठचा असल्याने येथे घरांमध्ये पाणी शिरले. परिणामी अनेक घरांतील अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तू, धान्य, कपडे व घरगुती साहित्य पूर्णपणे वाहून गेले आहे. या भागातील नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. शासन कर्जमाफी देत नाही, शेतीमालाला भाव नाही आणि त्यातच अतिवृष्टीमुळे बळीराजा अस्मानी-सुलतानी संकटात सापडला आहे, असे शेळके यांनी नमूद केले. आज ॲड. जयश्री शेळके यांनी माळीपुरा परिसरासह चिखली तालुक्यातील भोगावती, सोमठाणा, पेठ आणि बोरगाव काकडे या बाधित भागांचा दौरा केला. त्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी पाहणी केली आणि स्थानिक नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या.

चिखली, मोताळा आणि सिंदखेडराजा तालुक्यातील शेती पाण्याखाली गेली असून अनेक ठिकाणी जमीन खरडून गेली आहे. पिके पूर्णपणे नष्ट झाली आहेत. या नैसर्गिक आपत्तीत झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देणे अत्यंत आवश्यक आहे, असे शेळके यांनी सांगितले. तसेच त्यांनी चिखलीचे मा. तहसीलदार यांच्याशी संपर्क साधून माळीपुरा आणि इतर बाधित भागांतील नागरिकांना तातडीने धान्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्याची, तसेच तालुक्यातील शेतीचे पंचनामे करून त्वरित मदत देण्याची विनंती केली.

या पाहणीदरम्यान चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीचे मा. संचालक गजानन शेळके, मा. सोसायटी सदस्य शेषराव शेळके, माजी तंटामुक्ती अध्यक्ष गजानन काकडे, माजी सरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य दिनकर डुकरे, शिवसेना तालुकाप्रमुख किसनराव धोंडगे, शिवसेना युवा तालुका प्रमुख गजानन पवार, शहर प्रमुख श्रीराम झोरे, उपशहरप्रमुख रवि पेटकर, युवासेना उपशहरप्रमुख शंभू गाडेकर, युवासेना समन्वयक अनिल जावरे, शिवसेना ज्येष्ठ नेते विश्वासराव खंडागळे, मा. सरपंच बोरगाव काकडे गजानन वायाळ, मा. ग्रामपंचायत सदस्य बाळू पाटील तसेच सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.