EXCLUSIVE पालकमंत्री मकरंद आबांना झोप सुधरेना..! लोणारला रात्री पोहोचले, पण उठायला उशीर! सकाळपासून भेटणारे ताटकळत; आ. सिद्धार्थ खरात यांनाही वेटिंग रूम मध्ये करावी लागली प्रतीक्षा...

 
बुलडाणा(अक्षय थिगळे: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद पाटील आज बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. अतिवृष्टीचे संकट, हुमणी अळीने घातलेले थैमान, चिखली तालुक्यातील भरोसा येथील शेतकरी दांपत्याने केलेली आत्महत्या या सगळ्या घडामोडीनंतर उशिरा का होईना पालकमंत्री आढावा घ्यायला जिल्ह्यात आले आहेत. रात्री लोणार येथील शासकीय विश्रामगृहावर ते पोहोचले..रात्रीचा प्रवास आणि उशिरापर्यंत जागरण झाल्याने सकाळी उठायलाही पालकमंत्री पाटील यांना उशीर झाला..जवळपास सकाळी साडेदहा पर्यंत पालकमंत्री पाटील त्यांच्या बेडरूम मध्येच होते..त्यामुळे सकाळपासून त्यांना भेटण्यासाठी आलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना, राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना ताटकळत रहावे लागले..एवढेच काय खुद्द आ.सिद्धार्थ खरात यांनाही पालकमंत्री पाटील यांच्या उठण्याची प्रतीक्षा करत बसावे लागले..
तसे पाहता पूर्व नियोजित कार्यक्रमानुसार पालकमंत्री पाटील रात्री एक वाजता लोणारच्या शासकीय विश्रामगृहावर पोहचणार होते. मात्र रात्रीच्या कार्यक्रमामुळे त्यांना लोणार मध्ये पोहोचायला उशीर झाला.. उशिरापर्यंत जागरण झाल्याने सकाळी उठायलाही उशीर झाला. पालकमंत्र्यांचा दौरा असल्याने सकाळपासून शासकीय विश्रामगृह परिसरात महायुती, महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांसह अधिकाऱ्यांची ही गर्दी होती. कुणी साहेबांना निवेदन देण्यासाठी तर कुणी भेटण्यासाठी येत होतं..मात्र या सगळ्यांना बराच वेळ प्रतीक्षा करावी लागली.. आ.सिद्धार्थ खरात यांनाही जवळपास १ तास  प्रतीक्षा करावी लागली.आजच्या प्रवासात पालकमंत्री त्यांच्या सोयीनुसार अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत त्यानंतर दुपारी ४ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेणार आहेत. पालकमंत्र्यांचा आजचा मुक्काम बुलढाणा येथे होणार आहे..याच दौऱ्यात उद्या ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची देखील बैठक घेणार आहेत. त्यानंतर त्यांच्या सोयीनुसार ते पुण्याकडे रवाना होतील.