EXCLUSIVE राहुल गांधींच्या एका फोनने फिरलं राजकारण! राहुल बोंद्रेंचा भाजप प्रवेश रद्द; काँग्रेसमध्ये जल्लोष!
मुंबईत फडणवीसांच्या उपस्थितीत होणार होता पक्षप्रवेश; मध्यरात्रीच्या फोननंतर राजकारणाला नाट्यमय कलाटणी, हर्षवर्धन सपकाळ पडद्यामागचे सूत्रधार...
राहुल बोंद्रे यांनी स्वतः सोशल मीडियावर भाजप प्रवेशाची घोषणा केली होती. मुंबईतील पक्षप्रवेशासाठी कार्यकर्त्यांची तयारी पूर्ण झाली होती. काही समर्थक मुंबईत पोहोचले होते, तर शेकडो कार्यकर्ते मध्यरात्री मुंबईकडे रवाना होण्याच्या तयारीत होते. मात्र, अखेरच्या क्षणी काँग्रेसचे वरिष्ठ नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा राहुल बोंद्रे यांना फोन आला आणि त्यानंतर घटनाक्रमाने अनपेक्षित वळण घेतले.
राहुल गांधी आणि राहुल बोंद्रे यांच्यात झालेल्या फोनवरील संवादाचा व्हिडिओ बोंद्रे यांच्या निकटवर्तीयांकडून प्रसारित करण्यात आला आहे. या संवादात राहुल गांधी यांनी बोंद्रे यांना दबावाखाली निर्णय घेऊ नका, घाबरू नका, आम्ही तुमच्यासोबत आहोत, असा विश्वास दिल्याचे दिसून येते. ‘आप काँग्रेस के लिये लॉयल आदमी हो, गलती मत करना’, असे राहुल गांधी यांनी सांगितल्याचे व्हिडिओमध्ये ऐकू येते. तसेच त्यांच्यावर दबाव आणला जात असून मानसिक दबाव निर्माण केला जात असल्याचा उल्लेखही राहुल गांधी यांनी केल्याचे दिसते.
यावर राहुल बोंद्रे यांनी अत्यंत भावनिक शब्दांत राहुल गांधी यांच्याशी संवाद साधला. ‘आपकी तरफ देखकर इतने दिन लड़ रहा था... कुछ हार गया था बीच में... लेकिन भैय्या, एक कार्यकर्ता की दखल ली आपने... फोन किया तो फिर से हिम्मत जुटाके लड़ लूंगा’, असा भावनिक संवाद बोंद्रे यांनी केल्याचे व्हिडिओमध्ये दिसते. ‘आपका फोन आया तो मैं सब कुछ गंवा दूंगा... सब गया मेरा तो भी चलेगा, लेकिन आपकी लड़ाई में मैं आपके साथ रहूंगा’, असेही बोंद्रे यांनी म्हटल्याचे दिसून येते.
या फोनसंवादादरम्यान राहुल बोंद्रे प्रचंड भावुक झाले. काँग्रेसच्या सर्वोच्च नेतृत्वाकडून थेट फोन आल्याने बोंद्रे यांना अश्रू अनावर झाल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्यानंतर उद्या होणारा भाजप प्रवेश अधिकृतपणे रद्द करण्यात आला आणि काही तासांपूर्वी भाजप प्रवेशासाठी सुरू असलेली सर्व तयारी अचानक थांबली.
ही बातमी बुलडाणा जिल्ह्यात पोहोचताच काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. धाड, चिखली, अमडापूरसह विविध ठिकाणी काँग्रेस कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष केला, तर काही ठिकाणी पेढे वाटण्यात आले. ज्या पक्षप्रवेशामुळे काँग्रेसमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती, त्याच प्रवेशाच्या रद्द होण्याने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
राहुल बोंद्रेंची काय मजबुरी होती?
राहुल बोंद्रे यांच्या भाजप प्रवेशाची घोषणा झाल्यानंतर त्यांच्या राजकीय निर्णयामागे नेमकी कोणती परिस्थिती होती, हा प्रश्न चर्चेत होता. आता प्रवेशच रद्द झाल्याने या प्रश्नाला आणखी वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. स्वतः राहुल बोंद्रे यांनी भाजप प्रवेशाची घोषणा केली होती; मात्र राहुल गांधींच्या फोननंतर त्यांनी आपली भूमिका बदलली. त्यामुळे गेल्या काही दिवसांतील पडद्यामागील राजकीय घडामोडींची चर्चा आता पुन्हा रंगली आहे.
हर्षवर्धन सपकाळ पडद्यामागचे सूत्रधार?
राहुल गांधी आणि राहुल बोंद्रे यांच्यातील हा संवाद घडवून आणण्यात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची महत्त्वाची भूमिका असल्याचे समोर आले आहे. राहुल बोंद्रे हे सपकाळ यांना मोठ्या भावाप्रमाणे मानतात. त्यामुळे बोंद्रे यांना पुन्हा काँग्रेसच्या प्रवाहात आणण्यासाठी सपकाळ यांनी पडद्यामागून केलेल्या प्रयत्नांना या संपूर्ण घडामोडीत महत्त्व प्राप्त झाले आहे.
दरम्यान, उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणारा राहुल बोंद्रे यांचा भाजप प्रवेश रद्द झाल्याने चिखलीसह बुलडाणा जिल्ह्याच्या राजकारणाला अचानक नवे वळण मिळाले आहे. अवघ्या काही तासांत भाजप प्रवेशापासून काँग्रेससोबत पुन्हा लढण्याच्या भूमिकेपर्यंत झालेला हा प्रवास सध्या राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे.