प्रतापराव जाधव केंद्रीय मंत्री असले तरी आम्ही त्यांना उरून पुरतो! त्यांच्या अनेक घोटाळ्यांच्या फाईल आमच्याजवळ,वेळ आल्यावर जंतर मंतर वर आंदोलन करू...रविकांत तुपकरांचा हल्लाबोल!
क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष गजानन कावरखे यांना तडीपारीची नोटीस आली आहे,या संदर्भात रविकांत तुपकर यांनी हिंगोलीत पत्रकार परिषद घेत स्थानिक भाजपा आमदार तानाजीराव मुटकुळे यांच्यावर हल्लाबोल चढवला. याचवेळी त्यांनी स्वतःवर आणि क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या बुलडाणा जिल्ह्यातील कार्यकर्त्यांवर झालेल्या केसेसची देखील आठवण करून देत राजकीय वातावरण तापवले.
२०२४ च्या बुलढाणा लोकसभा निवडणुकीचा संदर्भ देत तुपकर म्हणाले, "मी अपक्ष म्हणून निवडणूक लढलो, तेव्हा प्रतापराव जाधव यांच्या पायाखालची वाळू सरकली. घाटावरील चार विधानसभा मतदारसंघांत आम्ही आघाडी घेतली आणि अडीच लाखांहून अधिक मते मिळवत त्यांना कडवी टक्कर दिली. त्यानंतरच आमच्या कार्यकर्त्यांवर दबावाचे राजकारण सुरू झाले."
तुपकर यांनी आरोप केला की, "आमच्या क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर टाले यांच्यावर तडीपारीची कारवाई करण्यात आली. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी लढणाऱ्यांवर कारवाई होते, पण गंभीर प्रकरणांतील आरोपींना मोकळे सोडले जाते. हा सत्तेचा उघड दुरुपयोग आहे."यावेळी त्यांनी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्यावर थेट निशाणा साधत, "ते केंद्रीय मंत्री असले तरी आम्ही त्यांना घाबरत नाही. कितीही खोटे गुन्हे दाखल करा, कितीही दडपशाही करा, आम्ही मागे हटणार नाही. ज्यांचे घर काचेचे आहे, त्यांच्या अनेक फाईली आमच्याकडे तयार आहेत. वेळ आली तर दिल्लीच्या जंतर-मंतरवर जाऊन सर्व काही जनतेसमोर मांडू," असा इशारा दिला. "आम्ही घराबाहेर पडताना पत्नीच्या कपाळावरील कुंकू पुसून बाहेर पडतो. आंदोलनात जीव गेला तरी चालेल, पण शेतकऱ्यांच्या हक्कासाठीचा संघर्ष थांबणार नाही. गोळीबार, लाठीमार आणि दडपशाहीला तोंड देत आम्ही लढलो आहोत. त्यामुळे कोणाच्याही धमक्यांना आम्ही भीक घालत नाही," असे ते म्हणाले.