चिखलीत हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह यांच्या पुतळ्याजवळ अतिक्रमण वाढले, अस्वस्छताही पसरली; नगर पालिका प्रशासनाने कारवाई करण्याची राणा फाउंडेशनची मागणी..!

 
चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) :चिखली शहरातील महाराणा प्रतापसिंह मार्केट परिसरातील अस्वच्छता, अतिक्रमण आणि पुतळ्याजवळील तड्यांबाबत राणा फाउंडेशनने नगरपालिका प्रशासनाकडे लेखी निवेदनाद्वारे तातडीने कारवाईची मागणी केली आहे. राणा फाउंडेशनचे अध्यक्ष संजय परिहार यांच्या नेतृत्वाखाली २४ जुलै रोजी हे निवेदन चिखली नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह मार्केट परिसरात राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन झालेला पुतळा असूनही त्या परिसराची दुरवस्था झाली आहे. मार्केट परिसरात मोठ्या प्रमाणात घाण, अतिक्रमण आणि देखरेखीअभावी नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. यापूर्वीही याबाबत प्रशासनाकडे वेळोवेळी निवेदने सादर केली आहेत, मात्र अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. 

"शहराच्या मध्यवर्ती व महत्त्वाच्या भागात हा पुतळा असूनही त्याजवळील तडे, अस्वच्छता आणि अतिक्रमण हे न.प.च्या दुर्लक्षाचे प्रतीक आहे. त्यामुळे मुख्याधिकारी यांनी स्वतः लक्ष घालून तातडीने कार्यवाही करावी," अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली. निवेदनावर संजय सुरेश परिहार, उध्दव प्रतापसिंह सुरडकर, प्रल्हाद आत्माराम गाडेकर, बिदेसिंग रामसिंग इंगळे, अ‍ॅड. संजीव वामनराव सदार, राणा रामकैलास सुरडकर, नंदकिशोर परिहार, विलास सुरडकर, आत्माराम इंगळे, गजानन सोळंकी, मनोज सोळंकी, संतोष परिहार, अनिल चाैहान आदींची स्वाक्षरी आहे.