मास्तरांची निवडणूक! अमरावती शिक्षक मतदारसंघात निवडणुकीचा पारा चढला! एका दिवसात ११ उमेदवारांचे १८ अर्ज;
आज ५ ऑक्टोबरला दाखल झालेल्या अर्जांमध्ये सर्वाधिक राजकीय लक्ष वेधून घेणारे नाव म्हणजे विद्यमान आमदार किरण सरनाईक. त्यांनी शिवसेना आणि अपक्ष अशा स्वरूपात अर्ज दाखल केले आहेत. दुसरीकडे भोयर चंद्रशेखर उर्फ शेखर मनोहरराव यांनी भाजप तसेच अपक्ष अशा स्वरूपात नामनिर्देशनपत्र दाखल केले आहे. त्यामुळे महायुतीच्या अधिकृत उमेदवाराभोवतीच आता राजकीय समीकरणे फिरणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. विशेष म्हणजे महायुतीतील उमेदवारीवरून आधीपासूनच हालचाली सुरू होत्या. दुसरीकडे शिक्षक भारतीचे सुरेश देवकर आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून दत्तात्रय लहाने यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
११ चेहरे, १८ अर्ज; शिक्षक मतदारसंघात बहुरंगी लढत
आज अर्ज दाखल करणाऱ्यांमध्ये
दिलीप भिमराव कडू — अपक्ष
,डॉ. प्रशांत विश्वेश्वर विघे — अपक्ष + अपक्ष,दत्तात्रय श्रीराम लहाने — शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे),सुरेश बाबुराव देवकर — समाजवादी गणराज्य पार्टी + अपक्ष,गजानन गोविंदराव डोके — भारतीय जनसम्राट पार्टी
,भोयर चंद्रशेखर उर्फ शेखर मनोहरराव — भाजप + अपक्ष,सुनील दुर्गादास राठोड — अपक्ष,सुमित सुरेशराव पवार — अपक्ष,गजानन रामचंद्र उल्हे — अपक्ष,किसनराव रामराव सरनाईक — शिवसेना + अपक्ष
,अविनाश मधुकर बोर्डे — अपक्ष + अपक्ष यांचा समावेश आहे.
याशिवाय आज १५ व्यक्तींनी तब्बल ३० नामनिर्देशनपत्रांची उचल केली. म्हणजेच उद्याच्या अंतिम दिवशी आणखी राजकीय धक्के आणि नवी नावे समोर येण्याची शक्यता कायम आहे.
महायुतीसमोर आव्हान, मविआतही वेगवेगळे चेहरे
अमरावती शिक्षक मतदारसंघात यंदा केवळ पक्ष विरुद्ध पक्ष अशी सरळ लढत राहिलेली नाही. महायुतीतील इच्छुक, मविआतील स्वतंत्र उमेदवारी आणि विविध शिक्षक संघटनांचे चेहरे यामुळे समीकरण गुंतागुंतीचे झाले आहे.
काँग्रेसने अदिती पोहरे यांना उमेदवारी दिली आहे, तर शिवसेना ठाकरे गटाने दत्तात्रय लहाने यांना मैदानात उतरवले आहे. त्यामुळे मविआतीलही मतविभाजनाची शक्यता राजकीय चर्चेचा विषय बनली आहे. दुसरीकडे महायुतीत अमरावतीची जागा शिंदे गटाकडे जाण्याच्या पार्श्वभूमीवर भाजपमधील इच्छुकांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. भाजपच्या चंद्रशेखर भोयर यांनी आज अर्ज दाखल केल्याने या चर्चेला आणखी धार आली आहे.
उद्या अंतिम दिवस; कोण माघार घेणार?
उद्या ६ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची मुदत संपणार आहे. त्यानंतर ७ ऑक्टोबरला अर्जांची छाननी होईल आणि ९ ऑक्टोबरला उमेदवारी मागे घेण्याची अंतिम मुदत आहे.
त्यामुळे उद्याचा दिवस अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी निर्णायक ठरणार आहे. कोणाचा अर्ज कायम राहतो?
कोण माघार घेतो?
कोण बंडखोरी कायम ठेवतो?
आणि शेवटी शिक्षक मतदारांसमोर किती उमेदवारांचे पर्याय उरतात? या सर्व प्रश्नांची उत्तरे ९ ऑक्टोबरनंतरच स्पष्ट होतील. मात्र आजच्या १८ अर्जांनी अमरावती शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीची लढत चांगलीच तापल्याचे स्पष्ट झाले आहे....