Election Special मेरा खुर्द नव्हे आता शेळगाव आटोळ जिल्हा परिषद सर्कल!

 
बुलडाणा(कृष्णा सपकाळ:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): ग्रामीण भागाचे मिनी मंत्रालय समजल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकांचे पडघम काही दिवसांत वाजणार आहेत. त्या दृष्टीने प्रशासकीय पातळीवर तयारीला वेग आला आहे. २२ ऑगस्टला जिल्हाधिकारी डॉ.किरण पाटील यांच्या स्वाक्षरीने जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीसाठी अंतिम प्रभाग रचना जाहीर झाली. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी ६१ गट तर पंचायत समितीचे १२२ गण राहणार आहेत. दरम्यान आतापर्यंत मेरा खुर्द या नावाने ओळखल्या जाणारा जिल्हा परिषदेचा गट आता यापुढे शेळगाव आटोळ या नावाने ओळखल्या जाणार आहे... हे या प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रभाग रचनेचे वैशिष्ट आहे.
शेळगाव आटोळ जिल्हा परिषद सर्कल मध्ये २ गावे ही चिखली मतदारसंघातील राहणार असून उर्वरित गावे ही सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघातील आहेत. या गटातील पंचायत समिती गणांची नावे शेळगाव आटोळ आणि मेरा खुर्द अशी निश्चित करण्यात आली आहेत. शेळगाव आटोळ जिल्हा परिषद गटात एकूण १३ ग्रामपंचायती असणार हे निश्चित झाले आहे. मलगी गाव केळवद जिल्हा परिषद सर्कल मध्येच असणार आहे, या गावाचा समावेश जुन्या मेरा खुर्द जिल्हा परिषद सर्कल मध्ये म्हणजेच आताच्या शेळगाव आटोळ जिल्हा परिषद सर्कल मध्ये करण्यात यावा अशी मागणी समोर आली होती, मात्र तसा निर्णय होऊ शकला नाही.