भरोसा शिवारातील इ-पिक पाहणी लोकेशन गोंधळात; भरोसा गावात लोकेशन दाखवते भोरसी;काळोनावाडी येथील शेतकऱ्यांची तांत्रिक अडचणींवर उपाययोजनेची मागणी!

विनायक सरनाईक यांच्या नेतृत्वात दिले निवेदन! प्रशासनाकडून कार्यवाहीचे आदेश...
 
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): राज्यातील शेतकऱ्यांसाठी डिजिटल क्रॉप सर्व्हे (E-Crop Survey) ॲपद्वारे खरीप व रब्बी हंगामातील पिकांची नोंदणी अनिवार्य करण्यात आली आहे. मात्र चिखली तालुक्यातील मौजे काळोना येथील भरोसा शिवारातील शेतकऱ्यांना यावर्षीही लोकेशन गोंधळाचा फटका बसत आहे. आपल्या शेतात इ-पिक पाहणी करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांना ॲपमध्ये गट क्रमांकाचे स्थळ २०-२५ कि.मी. अंतरावर असलेल्या भोरसा (भोरसी) गावालगतचे दाखवत असल्याने नोंदणी होऊ शकत नाही.
ही समस्या दरवर्षी उद्भवत असून, त्यामुळे शेतकऱ्यांना खरीप व रब्बी हंगामात शासकीय योजनांपासून वंचित राहण्याची भीती आहे. या तांत्रिक अडचणीबाबत क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे विनायक सरनाईक, गणेश थुट्टे आदी शेतकऱ्यांनी १३ ऑगस्ट रोजी उपविभागीय अधिकारी शरद पाटील व तहसीलदारांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.

“भरोसा ऐवजी लोकेशन भोरसा दाखवते”...
शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, डिजिटल ॲपवर नोंदणी करताना ५० मीटर परिसरात उभे राहून पिकाचा फोटो घेणे आवश्यक आहे. मात्र भरोसा भाग १ व भाग २ मधील शेतकरी ॲप उघडल्यावर लोकेशन भोरसा गाव दाखवत असल्याने फोटो अपलोड होत नाही..

प्रशासनाची तत्काळ कार्यवाहीची हमी..
शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन उपविभागीय अधिकारी यांनी तांत्रिक दुरुस्तीसाठी कार्यवाहीचे आदेश दिले आहेत. लोकेशन योग्य (भरोसा) दिसेल, अशी अपमध्ये सुधारणा करण्याचे व संबंधित तलाठी-मंडळ अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष स्थळावर जाऊन इ-पिक पाहणी करण्याचे निर्देश देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

न सुटल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा...

सरनाईक यांनी इशारा दिला की, जर ही समस्या कायमस्वरूपी सोडवली नाही तर शेतकरी तीव्र आंदोलन उभारतील. “डिजिटल पद्धती सोपी आणि जलद असल्याचा दावा केला जात असला तरी आमच्या बाबतीत ती उलट त्रासदायक ठरत आहे,” असे स्थानिक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. यावेळी ॲड. गणेश थुट्टे, एकनाथ उसर, मधुकर उसर, संजय उसर, दिनकर उसर, भगवान शिंदे, प्रविण उसर, ज्ञानेश्वर उसर, अशोक उसर, सचिन उसर आदी शेतकरी उपस्थित होते.