जिल्ह्यातील ९ तालुक्यांना लागू हाेणार दुष्काळी सवलती; नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट मदत मिळणार; अतिवृष्टीग्रस्त तालुक्यांची यादी शासनाकडून जाहीर; चार तालुक्यांना वगळले...

 
बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : जिल्ह्यासह राज्यभरात जून ते सप्टेंबर या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीने माेठ्या प्रमाणात नुकसान झाले. नदी, नाल्यांना पूर येवून शेकडाे हेक्टर जमीन खरडून केली. नुकसानग्रस्तांसाठी राज्य शासनाने नुकतीच ३१ हजार काेटी रुपयांचे विशेष पॅकेज जाहीर केले आहे. राज्यातील २५३ तालुक्यांना हे पॅकेज मिळणार असून यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील ९ तालुक्यांचा समावेश आहे. या ९ तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट मदत मिळणार असून दुष्काळी सवलतीही लागू हाेणार आहे. जिल्ह्यातील चार तालुक्यांना मात्र, अतिवृष्टीग्रस्त तालुक्यांमधून वगळण्यात आल्याने या तालुक्यातील शेतकरी मदतीपासून वंचित राहणार आहेत. याविषयी शासनाने ९ ऑक्टाेबर राेजी शासन आदेश जारी केला आहे. 
विभागीय आयुक्त आणि कृषी विभागाकडून मिळालेल्या नुकसानभरपाईच्या अहवालावरून शासनाने २५३ तालुक्यांना अतिवृष्टीग्रस्त म्हणून घाेषीत केले आहे. या तालुक्यातील नुकसानग्रस्तांना शासनाने जाहीर केलेल्या पॅकेजनुसार सरसकट मदत मिळणार आहे. या २५३ तालुक्यांमध्ये बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर, सिंदखेड राजा, बुलढाणा, शेगाव, नांदुरा, देउळगाव राजा, चिखली, माेताळा आणि खामगाव या तालुक्यांचा समावेश आहे. या तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट मदत मिळणार आहे. तसेच संग्रामपूर, लाेणार, मेहकर आणि जळगाव जामाेद या तालुक्यांना मात्र अतिवष्टीग्रस्त तालुक्यांमधून वगळण्यात आले आहे. त्यामुळे, या चार तालुक्यातील शेतकरी मदतीपासून वंचित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.

प्रतापराव जाधव , संजय कुटे यांचे तालुके वगळले 
केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव आणि भाजपचे आमदार डॉ संजय कुटे यांचे तालुके सरसकट मदतीतून वगळण्यात आले आहे.त्यामुळे आता राजकारण पेटण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे मेहकर आणि लोणार तालुक्यात सप्टेंबर महिन्यात ढगफुटी सारखा पाऊस होऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.तसेच संग्रामपूर आणि जळगाव जामोद तालुक्यातही मोठ्या प्रमाणात पाऊस झाला होता.त्यामुळे आता या चार तालुक्यांना वगळण्यात आल्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.