खामगाव-मेहकर शिवाई बसमध्ये चालकाचा मोबाईलवरून प्रवास; प्रवाशांचा जीव धोक्यात! रस्त्याकडे लक्ष देण्याऐवजी चालक मोबाईलमध्ये बिझी !जानेफळ परिसरातील प्रकाराने संताप
खामगाव आगाराची खामगाव-मेहकर शिवाई बस आज सकाळच्या सुमारास मेहकरच्या दिशेने जात असताना हा प्रकार समोर आला. बसमध्ये प्रवासी असतानाही चालक मोबाईलमध्ये व्यस्त असल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे जानेफळ बसस्थानक परिसरातही चालक हातात मोबाईल घेऊन बस चालवत असल्याचे निदर्शनास आले.बस चालविताना चालकाचे काही क्षणांसाठी जरी रस्त्यावरून लक्ष हटले, तरी त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. शिवाय शिवाई बसमध्ये मोठ्या संख्येने प्रवासी प्रवास करतात. अशा परिस्थितीत चालकाने मोबाईलचा वापर करणे म्हणजे केवळ वाहतूक नियमांचे उल्लंघन नव्हे, तर शेकडो प्रवाशांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार असल्याची संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
अपघात झाला तर जबाबदार कोण?
चालकाचे लक्ष रस्त्याऐवजी मोबाईलकडे असताना अचानक समोर वाहन आले, पादचारी रस्त्यावर आला किंवा अन्य काही अडथळा निर्माण झाला तर वाहनावर नियंत्रण मिळविण्यासाठी लागणारा वेळ अत्यंत महत्त्वाचा ठरतो. अशा निष्काळजीपणामुळे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
त्यामुळे ‘शिवाई’ बससेवा प्रवाशांच्या सुविधेसाठी आहे की त्यांच्या जीवाशी खेळण्यासाठी? असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे. संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकाराची तातडीने दखल घेऊन घटनेची चौकशी करावी. तसेच चालकाने नियमांचे उल्लंघन केले असल्याचे निष्पन्न झाल्यास त्याच्यावर नियमानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.प्रवाशांचा जीव धोक्यात घालणाऱ्या अशा प्रकारांकडे एसटी महामंडळ प्रशासनाने गांभीर्याने पाहणे गरजेचे असून, भविष्यात अशा घटना घडणार नाहीत यासाठी चालकांना कठोर सूचना देण्याची आवश्यकता आहे.