सत्कार नको, संकटग्रस्तांना मदतीचा हात द्या! आमदार श्वेता महालेंच्या आवाहनाला दानशूरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; मुख्यमंत्री सहायता निधीसाठी तब्बल ८ लाख ६२ हजारांची मदत!

कुणी वाढदिवसाचा खर्च टाळला, कुणी सत्काराचे पैसे दिले, तर दिव्यांग बांधवाने कष्टाच्या कमाईतून जपली माणुसकी...
 
चिखली (बुलढाणा लाइव्ह वृत्तसेवा) : राजकारणाच्या पलीकडे जाऊन समाजकारणाला प्राधान्य देणाऱ्या एका उपक्रमातून माणुसकीचे दर्शन घडले आहे. फुलांचे हार, शाल, श्रीफळ आणि सत्कारावर होणारा खर्च संकटग्रस्तांच्या मदतीसाठी वापरला जावा, या आमदार श्वेता महाले पाटील यांच्या भूमिकेला नागरिक, सामाजिक संस्था आणि दानशूर व्यक्तींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. आमदार महाले यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी तब्बल ८ लाख ६२ हजार ३०० रुपयांची मदत एकत्रित करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या मदतीमागे केवळ आर्थिक दातृत्व नाही, तर माणुसकीच्या अनेक हृदयस्पर्शी कहाण्या दडल्या आहेत. कुणी स्वतःचा वाढदिवस साजरा करण्याचा खर्च टाळला, कुणी सत्कारासाठी जमवलेली रक्कम दिली, तर एका दिव्यांग बांधवाने स्वतःच्या कष्टाच्या कमाईतून मदतीचा हात पुढे केला. आमदार महाले यांच्या पुढाकारातून चिखली आणि बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील नागरिकांसह पुणे-मुंबईतील दानशूर व्यक्तीही या सामाजिक उपक्रमाशी जोडल्या गेल्या आहेत.

चिखली येथील रेणुका देवी संस्थान आणि बच्चानंद महाराज संस्थान यांनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी एक लाख रुपयांचे योगदान दिले. वरखेड येथील ग्रामस्थांनी आमदार श्वेता महाले पाटील आणि विद्याधर महाले यांच्या सत्काराचे आयोजन केले होते. मात्र, आमदार महाले यांनी सत्काराला नम्रपणे नकार देत सामाजिक कार्याला प्राधान्य देण्याची भूमिका घेतली. त्यानंतर ग्रामस्थांनीही सत्कारावर होणारा खर्च टाळून २० हजार रुपये मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दिले. चिखली येथील राहुल भंडारे यांनी वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळत २५ हजार रुपयांचे योगदान दिले, तर गणपती विसर्जन मिरवणुकीदरम्यान ठेवण्यात आलेल्या मदतपेटीत नागरिकांनी ११ हजार रुपये जमा केले. या सर्वांमध्ये चिखलीतील दिव्यांग रवींद्र इंगळे यांचे योगदान विशेष भावस्पर्शी ठरले. स्वतः कापसाच्या वाती तयार करून उदरनिर्वाह करणाऱ्या इंगळे यांनी आपल्या कष्टाच्या कमाईतील २ हजार १०० रुपये मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दिले. मदतीसाठी मोठी आर्थिक परिस्थिती नव्हे, तर मोठे मन असावे लागते, याचीच प्रचिती त्यांच्या कृतीतून आली. बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील हतेडी आणि देऊळघाट येथील ग्रामस्थांनीही प्रत्येकी २ हजार १०० रुपयांची मदत दिली. याशिवाय मूळचे चिखलीचे आणि सध्या पुण्यात कार्यरत असलेले गजानन खेडेकर यांनी सुखकर्ता फाउंडेशनच्या माध्यमातून तब्बल ५ लाख रुपयांचा धनादेश आमदार महाले यांच्याकडे सुपूर्द केला. मुंबईतील व्यावसायिक स्नेहल चौक्सी यांनीही २ लाख रुपयांचे योगदान देत या उपक्रमात सहभाग नोंदवला.

दरम्यान, नागरिकांच्या या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे आमदार श्वेता महाले पाटील यांनी समाधान व्यक्त करत सर्व दानशूर व्यक्ती, संस्था आणि ग्रामस्थांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत. "यापुढे मी कोणत्याही गावात किंवा कार्यक्रमाला आले, तर माझा फुले, पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्याऐवजी त्या खर्चातून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी आपल्या इच्छेनुसार मदत करा. आपल्या छोट्याशा योगदानातून एखाद्या संकटग्रस्त कुटुंबाला आधार मिळू शकतो," असे भावनिक आवाहन त्यांनी केले आहे. लोकप्रतिनिधींच्या सत्कारापेक्षा संकटात सापडलेल्या माणसाला मदतीचा हात देणे अधिक महत्त्वाचे असल्याची भूमिका त्यांनी मांडली. त्यांच्या या आवाहनाला मिळालेल्या प्रतिसादातून समाजातील दातृत्वाची भावना पुढे आली असून, सत्काराच्या खर्चाला विधायक सामाजिक कार्याची जोड देण्याचा संदेश या उपक्रमातून मिळत आहे.