लोणारच्या तहसीलदारांना जिल्हाधिकारी कार्यालयाची भाषा कळत नाही? "दंड न आकारता" टिप्पर सोडल्याप्रकरणी वस्तुनिष्ठ अहवाल देता येईना...
वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याचे आदेश देऊन १५ दिवस उलटून देखील तहसीलदार श्री भुषण पाटील यांनी अहवाल दिलेला नाही. उपजिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा विसर पडलेल्या तहसीलदार श्री.भूषण पाटलांना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने पुन्हा एकदा २ जुलै रोजी याचे स्मरणपत्र पाठवण्यात आले आहे. मात्र ६ जुलैच्या दुपारपर्यंत तहसीलदारांनी अहवाल सादर केलेला नव्हता. याप्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयाने लोणारच्या तहसीलदारांशी आतापर्यंतचा केलेला पत्रव्यवहार हा मराठी भाषेत आहे.मात्र अजूनही लोणारच्या तहसीलदारांनी याप्रकरणी उत्तर न दिल्यास जिल्हाधिकारी कार्यालयाला तिसऱ्यांदा करावा लागणारा पत्रव्यवहार दुसऱ्या एखाद्या भारतीय भाषेत करावा लागू शकतो..
लोणारमध्ये नव्याने रुजू झालेल्या एसडीओ श्री. सानप यांच्या पथकाने टिप्पर पकडल्यानंतर तहसीलदार भूषण पाटील यांच्या तपासणी अहवालाच्या आधारे टिप्पर सोडले होते. कोणताही वैध परवाना नसतांना "मर्जीतला" माणूस असल्याने लोणारच्या तहसीलदारांनी नंतर काढलेला परवाना वैध ठरवून शासनाची फसवणूक केली. अर्थात लोणारच्या तहसीलदारांवर डोळ्यावर पट्टी ठेवून एसडीओ श्री. सानप यांनी विश्वास ठेवला तेही चूकच. या प्रकरणात जाणून बुजून तहसीलदारांनी घोळ केलेला असल्याचे उघड दिसत आहे. त्यामुळे तहसीलदारांना अजूनही उत्तर देता आलेले नाही. दरम्यान याप्रकरणी चुकवलेला दंड वसूल करण्याची कारवाई होण्याची शक्यता जिल्हाधिकारी कार्यालयातील सूत्रांनी वर्तवली आहे.
भागीदार शोधण्याचा प्रयत्न..
दरम्यान लोणारच्या तहसीलदारांना कारवाईची कुणकुण लागलेली आहे. संभाव्य कारवाई टाळण्यासाठी काही करता येईल का याची चाचपणी लोणारच्या तहसीलदारांकडून सुरू असल्याची समजते. जर दंड वसूल करण्याची कारवाई झालीच तर केवळ ठपका आपल्यावर पडू नये, टिप्पर पकडणारे, पंचनामा करणारे असे ५ –६ जणांनी मिळून त्या दंडाचा भार उचलावा असा प्रयत्न लोणारच्या तहसीलदारांकडून होत आहे. त्यादृष्टीने लोणारच्या तहसीलदारांकडून आता या प्रकरणात इतर अधिकाऱ्यांची विचारपूस सुरू असल्याची माहिती आहे.