शासकीय कर्मचाऱ्यांना सोशल मीडियावर 'डिजिटल शिस्त'; सामान्य प्रशासन विभागाची आचारसंहिता जाहीर..!
Updated: Jul 29, 2025, 14:30 IST
मुंबई (लाइव्ह ग्रुप नेटवर्क) : सोशल मीडियाच्या स्फोटक युगात शासकीय यंत्रणेचा विश्वास अबाधित ठेवण्यासाठी राज्य शासनाने शासकीय कर्मचाऱ्यांना साेशल मिडीयावर डिजिटल शिस्त लावण्याचा प्रयत्न केला आहे. शासकीय आणि निमशासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी सोशल मीडियावर वर्तनाबाबत आचारसंहिता लागू करण्यात आली असून, सामान्य प्रशासन विभागाने २८ जुलै रोजी त्यासंदर्भातील स्पष्ट मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. ही आचारसंहिता केवळ मार्गदर्शक नसून, ती शिस्तभंगाच्या कारवाईस पात्र ठरणारी बंधनकारक बाब असल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे.
प्रत्येक शासकीय कर्मचाऱ्याने त्याचे वैयक्तिक व कार्यालयीन सोशल मीडिया खाते स्वतंत्र ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. बदल्यानंतर त्या खात्यांचे हस्तांतरणही योग्यप्रकारे करण्याचे निर्देश आहेत. सरकारी पदनाम, वर्दी, इमारत, शासकीय वाहन, इ. शासकीय मालमत्तेचा उपयोग फोटो, व्हिडीओ, रील्ससाठी वैयक्तिक खात्यावर करू नये, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
शासनविरोधी टीका, गोपनीय माहिती शेअर केल्यास कारवाई
कोणत्याही राज्य किंवा केंद्र सरकारच्या धोरणावर प्रतिकूल टिप्पणी, आक्षेपार्ह मजकूर शेअर, फॉरवर्ड किंवा अपलोड केल्यास संबंधितांवर महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९ नुसार शिस्तभंगाची कारवाई होणार असल्याचा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे. गोपनीय कागदपत्रे अथवा शासकीय माहिती प्राधिकृत मंजुरीशिवाय शेअर करण्यास स्पष्ट मनाई करण्यात आली आहे. या सूचना राज्य शासनातील अधिकारी, कर्मचारी (प्रतिनियुक्ती, करारतत्त्वावरील व बाह्यस्त्रोत नियुक्त अधिकारीसहित) तसेच स्थानिक स्वराज्य संस्था, मंडळे, महामंडळे व सार्वजनिक उपक्रमांतील कर्मचारी व अधिकाऱ्यांवर बंधनकारक आहेत.