देऊळगाव राजा नगरपरिषद निवडणूक स्थगित; शेगाव–खामगाव–जामोदसह नऊ सदस्यपदे अडचणीत! नवीन वेळापत्रक जाहीर...

 
बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या असतानाच देऊळगाव राजा नगरपरिषद निवडणुकीला स्थगिती देण्यात आली आहे. यासोबतच शेगाव, खामगाव व जळगाव जामोद या नगरपरिषदांतील एकूण नऊ सदस्यपदांच्या निवडणुकीलाही तात्पुरती स्थगिती लागू झाली आहे. २५ नोव्हेंबर रोजी दाखल झालेल्या अपीलांवरील निर्णयामुळे हे पाऊल उचलले गेले असून, आता २० डिसेंबर रोजी मतदान होणार असल्याचे नव्या कार्यक्रमानुसार निश्चित करण्यात आले आहे.

अपीलांमुळे बदलले समीकरण

देऊळगाव राजा येथील निर्मला खैरनार यांनी नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला होता. उमेदवारी अर्जातील त्रुटींवरून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांचा अर्ज बाद केला. जिल्हा न्यायालयानेही अपील फेटाळल्यानंतर त्या उच्च न्यायालयात जाण्याच्या तयारीत होत्या.

महाराष्ट्र नगर पालिका निवडणूक नियम, १९६६ मधील कलम १५ अंतर्गत एकूण नऊ अपील २१ नोव्हेंबर रोजी खामगाव येथील जिल्हा न्यायालयात दाखल झाली. विविध उमेदवारांच्या अर्जांमध्ये गंभीर त्रुटी आढळून आल्या कालबाह्य नोटरीद्वारे प्रमाणित प्रतिज्ञापत्रे,
शपथपत्रांवर उमेदवारांच्या स्वाक्षऱ्यांचा अभाव,
राष्ट्रीय पक्षांनी दिलेल्या एबी फॉर्ममध्ये प्रभाग क्रमांक चुकीचा नमूद
या चुकांमुळे उमेदवारींच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे नोंदवण्यात आले आहे.

निवडणूक आयोगाचा निर्णय

बाद झालेल्या उमेदवारांना अर्ज मागे घेण्यासाठी पुरेसा वेळ न मिळाल्याने देऊळगाव राजा तसेच इतर प्रभावित नगरपरिषदांमध्ये संपूर्ण निवडणूक प्रक्रिया नव्याने राबविण्यात येणार आहे. यासंदर्भात जिल्हा प्रशासनाने अधिकृत प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे.

खामगावातील चार प्रभाग थेट प्रभावित

खामगाव नगरपरिषद क्षेत्रातील प्रभाग क्रमांक ५-अ, ७-अ, २-ब आणि १६-ब यांतील निवडणूक प्रक्रिया स्थगित झाली आहे. या घडामोडीमुळे तिन्ही शहरांमध्ये राजकीय वातावरणात अनिश्चितता निर्माण झाली आहे.

जळगाव जामोद व शेगाव येथील प्रभागांनाही स्थगिती

जळगाव जामोद – प्रभाग क्रमांक ६-अ, ६-ब, ७-ब

शेगाव – प्रभाग क्रमांक ४-अ, ४-ब
या प्रभागांतील निवडणुकीवरही स्थगिती लागू झाली असून, नवीन वेळापत्रकानुसारच मतदान होणार आहे.

सुधारित निवडणूक कार्यक्रम

नामनिर्देशन मागे घेण्याची अंतिम तारीख : १० डिसेंबर २०२५ (दुपारी २ वाजेपर्यंत)

अंतिम उमेदवार यादी व चिन्ह वाटप : ११ डिसेंबर २०२५

मतदानाचा संभाव्य दिवस (गरजेनुसार) : २० डिसेंबर २०२५, सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३०

मतमोजणी व निकाल जाहीर : २१ डिसेंबर २०२५, सकाळी १० वाजल्यापासून