बुलडाणा(अक्षय थिगळे :बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): होय.. खरंच समाजातील संवेदनशीलता हरवत चालली की काय? की संवेदनशीलता केवळ दाखवण्यासाठी असा प्रश्न उपस्थित होतोय....अर्थात स्वतःला राजकीय नेते म्हणून घेणाऱ्या पुढाऱ्यांमुळेच असे सवाल उपस्थित होऊ लागले आहेत. दुःखात आधार अपेक्षित असतो मात्र त्या आधाराऐवजी फोटोसेशन होत असेल, किंवा फोटोसेशन करण्यासाठीच आधार देतोय हे दाखवल्या जात असेल तर अशा विषयांची चर्चा समाजात होणारच..आपल्या समाजात एखादा अपघात, अकाली मृत्यू किंवा दुःखद घटना घडली की राजकीय नेत्यांनी दुःखग्रस्त कुटुंबाला भेट देऊन आधार देणे, ही अपेक्षित आणि स्वाभाविक गोष्ट आहे. माणुसकीपोटी हे करणे गरजेचेही आहे. पण आजकाल या "सांत्वन भेटी" हळूहळू सोशल मीडियावरील इव्हेंट ठरत चालल्या आहेत. सांत्वन भेट दिली की लगेच मोबाईल कॅमेरे, फोटोग्राफर्स तयार... आणि काही क्षणांत फोटो फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअप स्टेटसवर झळकतो. प्रश्न असा निर्माण होतो की नेते खरोखर दुःखात सहभागी व्हायला जातात की दुःखात सहभागी होतोय हे लोकांना दाखवायला जातात?
एखाद्या घरावर दुःखाचा डोंगर कोसळला असतो. अशा वेळी त्या घरातला प्रत्येक श्वास वेदनांनी भरलेला असतो. अशा नाजूक प्रसंगी फ्लॅश लावून फोटो काढणे ही कितपत संवेदनशीलतेची खूण? कुटुंबाला मानसिक आधार देणे अपेक्षित असताना फोटोसेशन करून "मी आलो, मी भेट दिली" अशी जाहीर नोंद करणे ही एक प्रकारची विकृतीच म्हणावी लागेल..खरे पाहता सांत्वन भेट ही माणुसकीची नैसर्गिक कृती असते. तिला प्रसिद्धीच्या चष्म्यातून पाहणे आवश्यक नाही. मात्र हल्लीची नेतेमंडळी सांत्वन भेटीतूनही ‘पब्लिसिटी’ शोधतात. ही प्रवृत्ती थांबली नाही तर समाजात खरी संवेदना, खरी सहानुभूतीच हरवेल... सांत्वन भेट ही दुःखात सहभागी होण्याची गंभीर वेळ असते; फोटोसेशनचा सोहळा नव्हे. नेत्यांनी इतकं तरी समजून घ्यायला हवं की दुःखाच्या प्रसंगाला मीडियाच्या लाईट्सपेक्षा शांततेचा, ममतेचा स्पर्श जास्त उपयोगी ठरतो.
आजचे नेते जर दुःखाच्या घरातही कॅमेऱ्यासाठीच पोझ देत असतील, तर उद्या लोकांचा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन सहानुभूतीचा नव्हे, तर उपहासाचा असेल...
मदतीचेही फोटो करतात व्हायरल...
एखाद वेळेस अतीव दुखःद घटना घडली तर सामाजिक मदतीचा ओघ त्या पीडित कुटुंबाकडे सुरू होतो. आपला बंधू संकटात असताना त्याच्या मदतीसाठी धावणे ही भारतीयांची स्वाभाविक प्रवृत्ती आहे. मात्र कधीकधी या मदतीचेही राजकारण करण्याचा प्रयत्न राजकीय नेत्यांकडून होतो. मुळात कुठल्याही स्वरूपाची मदत करीत असतांना त्याचे फोटोसेशन करणे, मदतीचा गवगवा करण्यासाठी प्रसिद्धी करणे कितपत योग्य? मदत स्वीकारणारा लाचार नसतो, ती वेळ त्या कुटुंबावर त्या परिस्थितीमुळे आलेली असते..मात्र याचेही भान नेत्यांना राहत नाही...एखादी मदत केल्यानंतर उपकार केल्याची जाणीव या पीडित कुटुंबाला करून देत असाल तर काय फायदा असल्या मदतीचा? म्हणून जनसेवेचे व्रत घेतलेल्या नेत्यांनो या गोष्टी पाळाच.. दुःखातील कुटुंबाला मायेचा, ममतेचा स्पर्श द्या... कॅमेऱ्याचा नको...!