सिलेंडर ९०० पार! मोताळा काँग्रेसचा संताप, दर तात्काळ कमी करण्याची मागणी; महागाईच्या ज्वाळेत जनता होरपळली; गॅस दरवाढीवर काँग्रेस आक्रमक...

 
मोताळा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : वाढत्या महागाईमुळे आधीच त्रस्त झालेल्या सर्वसामान्य जनतेवर केंद्र सरकारने एलपीजी गॅसच्या दरवाढीचा आणखी एक मोठा भार टाकला असल्याचा आरोप करत मोताळा तालुका काँग्रेस कमिटीने केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. गॅसच्या वाढत्या किमती तात्काळ कमी कराव्यात, या मागणीसाठी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी तहसीलदारांमार्फत निवेदन सादर केले. निवेदनात काँग्रेसने म्हटले आहे की, महागाईमुळे सामान्य नागरिकांचे जगणे कठीण झाले असताना केंद्र सरकार एलपीजीच्या किमती वाढवून जनतेची “पठाणी लूट” करत आहे. युपीए सरकारच्या काळात डॉ. मनमोहन सिंह यांच्या नेतृत्वाखाली आंतरराष्ट्रीय बाजारात दर वाढले तरी त्याचा बोजा जनतेवर पडू दिला नाही, उलट सबसिडीद्वारे सर्वसामान्यांना दिलासा दिला गेला होता, असे काँग्रेसने नमूद केले.
काँग्रेसच्या म्हणण्यानुसार, युपीए सरकारच्या काळात घरगुती गॅस सिलेंडर सुमारे ४०० रुपयांना उपलब्ध होता, तर सध्या त्यासाठी ९०० रुपयांपेक्षा जास्त रक्कम मोजावी लागत आहे. तसेच सिलेंडर बुकिंगचा कालावधी १५ दिवसांवरून एक महिन्यापर्यंत वाढविण्यात आल्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचा आरोप करण्यात आला.

व्यावसायिक गॅस सिलेंडरचे दरही १९०० रुपयांपर्यंत पोहोचले असून त्याचे रेशनिंग सुरू असल्याने हॉटेल, खानावळी तसेच छोटे खाद्यव्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना मोठा फटका बसत असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. विद्यार्थ्यांपासून कामगार आणि नोकरदारांपर्यंत अनेकांना बाहेर जेवणावर अवलंबून राहावे लागते. अशा परिस्थितीत व्यावसायिक गॅस महाग झाल्यास खाद्यपदार्थांचे दरही वाढण्याची शक्यता असल्याचा इशारा निवेदनात देण्यात आला.

सरकारकडून गॅसची टंचाई नसल्याचा दावा केला जात असला तरी प्रत्यक्षात नागरिकांना सिलेंडर वेळेवर मिळत नसल्याची तक्रार काँग्रेसने केली आहे. त्यामुळे घरगुती तसेच व्यावसायिक गॅस सिलेंडर नागरिकांना विनाअडथळा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात आणि वाढवलेल्या किमती त्वरित कमी कराव्यात, अशी मागणी करण्यात आली.

हे निवेदन मोताळा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रवीण (आप्पा) अर्जुन कदम तसेच शहराध्यक्ष निनाभाऊ इंगळे यांच्यासह काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी तहसीलदारांकडे सादर केले. दरम्यान, जनतेला दिलासा मिळाला नाही तर काँग्रेसकडून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.