संस्कृती हा राष्ट्राचा आत्मा! भूमी, समाज आणि संस्कृतीने राष्ट्र बनते; स्वातरंजनजी यांचे प्रतिपादन! चिखली येथे प्रमुख जनसंगोष्टी संपन्न....

 
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):राष्ट्र ही सांस्कृतिक संकल्पना आहे. राज्य, देश आणि राष्ट्र या वेगवेगळ्या संज्ञा आहेत. राज्य ही राजनैतिक ,देश भौगोलिक तर राष्ट्र ही सांस्कृतिक संकल्पना आहे. भूमी,समाज आणि संस्कृतीने राष्ट्र बनते. संस्कृती राष्ट्राचा आत्मा आहे. या देशाची ओळख हिंदुत्व आहे आणि भारत हे हिंदुराष्ट्र आहे , या हिंदुराष्ट्राच्या परम वैभवासाठी संघ व्यक्ती निर्माणाचे  काम करतो. संघ शाखेतून तयार झालेले स्वयंसेवक  समाजाच्या विविध क्षेत्रात राष्ट्राच्या उन्नतीसाठी कार्य करतात. आता पंचपरिवर्तनाची मूल्ये समाजात रुजवण्यासाठी संघाचे स्वयंसेवक काम करीत आहेत, समाजानेही या मूल्यांचा अंगीकार करून विकसित भारतासाठी योगदान द्यावे असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचारक प्रमुख स्वातरंजनजी यांनी केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ बुलढाणा जिल्ह्याच्या वतीने प्रमुख जनसंगोष्टी कार्यक्रम चिखली येथे पार पडला यावेळी ते बोलत होते. मंचावर विभाग संघचालक चित्तरंजन राठी, जिल्हा संघचालक सुभाष मोरे व संयोजक केदार ठोसर यांची उपस्थिती होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षात निमित्ताने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. 
पुढे बोलतांना ते म्हणाले की, पाश्चिमात्य संस्कृतीत असलेली नेशन ही संकल्पना इंग्रजांनी शिक्षण पद्धतीतून भारतावर थोपवण्याचा प्रयत्न केला. धर्म आणि रिलीजन या संज्ञा एकच असल्याचे सांगण्याचे काम पाश्चात्यांनी केले, जे पूर्णपणे चुकीचे आहे. आपल्या देशाचा इतिहासाचा अभ्यास देशात राहून केला पाहिजे. आपल्या देशात आपल्या ऋषींनी राष्ट्र ही संकल्पना स्पष्ट केली आहे. सिंधू सागर ते सिंधू नदी या प्रदेशात राहणारा जो समाज या देशाला पितृभूमी मातृभूमी पुण्यभूमी मानतो तो हिंदू समाज आहे असेही स्वातरंजनजी म्हणाले.

पंचपरिवर्तनातून समाजपरिवर्तन...

सामाजिक समरसता, कुटुंबप्रबोधन, पर्यावरण, स्वदेशी आणि नागरी शिष्टाचार या पंच परिवर्तनाच्या मूल्यांतून समाज परिवर्तनाचे काम संघ करतो आहे. या देशाला मातृभूमी, पुण्यभूमी मानणारा प्रत्येक व्यक्ती हिंदू आहे. इथे कुणीही दलित नाही, पतीत नाही. आपण सर्व हिंदू सहोदर अर्थात एकाच आईची लेकरे आहोत हा समरसतेचा विचार हिंदू समाजात  रुजला पाहिजे. समरसतेचा व्यवहार हा प्रत्येकाच्या आचरणात असला पाहिजे. आपल्या घरातील भांडी घासणार्‍या मावशीपासून तर पेपर टाकणारा, दूध आणणारा या प्रत्येकाशी आपला व्यवहार कसा आहे? त्यांना आपण आपल्या कुटुंबातील घटक मानतो का? यावर चिंतन करण्याची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले. आपल्या राष्ट्राची उभारणी कुटुंब व्यवस्थेतून झाली आहे. कुटुंब व्यवस्था ढसाळली तर अनेक आव्हाने आपल्यासमोर निर्माण होतील. कुटुंब व्यवस्थेच्या अभावी पाश्चात्य देशांमध्ये काय परिस्थिती निर्माण झाली आहे हे आपण पाहतो. पाश्चात्यांचे अनुकरण केल्याने आपल्या देशात देखील काही प्रमाणात कुटुंब व्यवस्था धोक्यात आली आहे. आई, वडील, मामा, आत्या, आजी ,काका ही नाती टिकली पाहिजेत. संस्काराचे पहिले केंद्र हे कुटुंब आहे असे स्वातरंजनजी म्हणाले. यावेळी त्यांनी पर्यावरणाच्या मुद्द्यालाही स्पर्श केला. या देशाला आपण भोगभूमी मानत नाही तर पुण्यभूमी मानतो. त्यामुळे प्रकृतीकडून घेताना आवश्यक तेवढेच घ्यावे, याशिवाय पर्यावरणाचा समतोल ठेवण्यासाठी पुढाकार घेण्याची आवश्यकता असल्याचे स्वातरंजनजी म्हणाले. 

पाण्याचा, विजेचा आवश्यक तेवढाच उपयोग करावा. आपले घर,आपले उत्सव प्लास्टिक मुक्त कसे राहील? अशा छोट्या छोट्या गोष्टींच्या आचरणातून पर्यावरणाला हातभार लावता येईल असेही ते म्हणाले. विकसित भारताकडे वाटचाल करीत असताना स्वदेशीचा आग्रह आपण ठेवला पाहिजे. भारताला आत्मनिर्भर करण्यासाठी आपल्याच देशात निर्मित झालेल्या वस्तूंच्या वापराचा आग्रह रोजच्या व्यवहारात असावा. याशिवाय भाषा, भूषा, भ्रमण, भजन, भोजन,      यातही "स्व" चा अधिक आग्रह असला पाहिजे असेही ते म्हणाले. नागरी शिष्टाचार हा पंच परिवर्तनाच्या मूल्यांपैकी महत्वाचा बिंदू आहे. आपल्या हक्कांसाठी अनेकदा लढा उभारल्या जातो. मात्र आपल्या नागरी कर्तव्यां प्रति आपण तेवढे जागरूक आहोत का? असा सवाल उपस्थित करतांना आपल्याला राष्ट्रीय कर्तव्याची जाण असली पाहिजे. संविधानिक मूल्यांचा अभिमान असला पाहिजे. राष्ट्राच्या उभारणीसाठी प्रत्येकाच्या व्यवहारात नागरिक शिष्टाचार महत्वाचा आहे असेही स्वातरंजनजी म्हणाले.

भोगभूमी नव्हे पुण्यभूमी...

या देशातला समाज या भूमीला पुण्यभूमी मानतो. या उलट पाश्चात्य समाज तिथल्या मातीला केवळ भोगभूमी मानतो हा आपल्या आणि त्यांच्या संस्कृतीच्या विचारधारेचा प्रमुख फरक असल्याचे स्वातरंजनजी म्हणाले. या राष्ट्राला परम वैभवाच्या शिखरावर पोहोचवायचे काम राष्ट्राच्या पुत्रांनाच करावे लागणार आहे. सामाजिक समरसता, कुटुंब प्रबोधन, पर्यावरण, स्वदेशी आणि नागरी कर्तव्य या पंच परिवर्तनाच्या बिंदूंना प्रत्यक्ष व्यवहारात उतरवण्याची गरज असल्याचे स्वातरंजनजी म्हणाले. कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात स्वातरंजनजी यांनी उपस्थित आमच्या शंकांचे निरसन केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.