पूलाअभावी थर्माकोलच्या तराफ्यावरून नदी पार; अमोना ग्रामस्थांचा सामूहिक जलसमाधीचा इशारा...
या समस्येबाबत ग्रामस्थांनी २२ सप्टेंबर रोजी जालना पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन सादर केले. १९९२ मध्ये बांधलेल्या डोलखेडा धरणामुळे निर्माण होणारे बॅक वॉटर आजवर अमोना व परिसरातील शेकडो कुटुंबांसाठी मोठा अडथळा ठरत आहे.
दरम्यान, ग्रामस्थांनी मागणी केली आहे की, बॅक वॉटरचा निचरा करण्यासाठी ड्रेनेज किंवा कटऑफ योजना राबवावी, नदीवर कायमस्वरूपी पूल उभारावा आणि पिकांचे नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांना भरपाई द्यावी.
आरोग्य सेवेतही मोठी गैरसोय निर्माण झाली आहे. आजारी व्यक्ती व गर्भवती महिलांना दवाखान्यात नेणे कठीण झाले आहे. पावसाळ्यात २०० ते ५०० कुटुंबे बॅक वॉटरमुळे अडकून पडतात.
नदीवर पूल नसल्याने विदर्भ-मराठवाड्याचा संपर्क तुटतो. सावरखेड, गोंधनखेड, सिपोरा, वरूड या गावांची वाहतूक ठप्प होते. चारशे ते पाचशे एकर शेती पाण्याखाली जाऊन पिकांचे नुकसान होते. शेतकरी जमीन पडिक पडू नये म्हणून तराफा बनवून नदी पार करतात. सांडव्याची उंची वाढवल्याने बॅक वॉटरची पातळी आणखी वाढल्याची तक्रारही ग्रामस्थांनी केली आहे.