रेती माफियांविरुध्द धडक कारवाई सुरूच; दोन टिप्परसह सहा ब्रास रेती जप्त; महसूल विभागाच्या पथकाची नारायणखेड परिसरात कारवाई...
या कारवाईत एमएच-२८-बीबी-७४८९ क्रमांकाचा टिप्पर चालक प्रवीण डोईफोडे व मालक मनोज चेके (रा. तांदूळवाडी, ता. सिंदखेड राजा) यांच्याकडून तीन ब्रास रेतीसह लाखो रुपयांचा टिप्पर जप्त करण्यात आला. त्यानंतर दुसरा एमएच-२८-बीबी-०५५६ क्रमांकाचा टिप्पर पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना महसूल पथकाने पकडला. या वाहनातूनही तीन ब्रास रेती आढळून आली असून चालक अनिकेत दौंड व मालक राहुल धनवटे असल्याची माहिती प्रशासनाने दिली. दोन्ही टिप्परमधील एकूण सहा ब्रास रेती आणि लाखो रुपयांची वाहने जप्त करून देऊळगाव राजा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली आहेत. या कारवाईत ग्राम महसूल अधिकारी परमेश्वर बुरुकुल, आकाश खरात, तेजस शेटे, महसूल सेवक कविता शिरसाट, शिपाई संतोष भोपळे व ताठे आदींचा सहभाग होता. महसूल विभागाकडून सातत्याने कारवाई होत असली तरी रेती तस्करी थांबण्याचे चित्र दिसत नाही. प्रशासनाने मोहीम अधिक कडक केल्यास अवैध उत्खननावर आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.