लोणार शहरात दुषीत पाण्याचा पुरवठा; उद्धव सेनेची मुख्याधिकाऱ्यांविरुद्ध पाेलिसात तक्रार; दुषीत पाण्यासाठी जबाबदार धरून गुन्हा दाखल करण्याची मागणी..!
Aug 28, 2025, 17:08 IST
लाेणार (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : शहरात गत काही दिवसांपासून दुषित, पिवळसर आणि दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा हाेत आहे. त्यामुळे, नगर परिषदेच्या मुख्याधिकारी विभा वऱ्हाडे, पाणीपुरवठा विभागाचे अभियंता व आरोग्यसेवा अधिकारी यांच्या विरोधात संविधानातील कलम २१ चे उल्लंघन व बीएनएस कलम १२३ (आयपीसी ३२८) नुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी करीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
लाेणार शहरात नियमीत आणि स्वच्छ पाणीपुरवठा व्हावा, यासाठी उद्धव सेनेच्या वतीने अनेक वेळा निवेदने दिली. तसेच मे २०२३ मध्ये उपाेषण केले हाेते. त्यावेळी मुख्याधिकाऱ्यांनी आठ दिवसातून एकदा स्वच्छ व फिल्टर केलेला पाणीपुरवठा केला जाईल, असे लेखी आश्वासन दिले होते. मात्र, त्यानंतरही नगर परिषदेकडून दूषित, पिवळसर, दुर्गंधीयुक्त पाणी नागरिकांना पुरविले गेल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. दूषित पाणीपुरवठा करून नगर परिषद प्रशासन जनतेच्या आरोग्याशी खेळत आहे. नागरिकांच्या हक्कावर गदा आणली जात आहे. त्यामुळे मुख्याधिकाऱ्यांसह संबंधित अधिकारी शिक्षेस पात्र असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तक्रार देताना जिल्हा संघटक डॉ. गोपाल बछिरे,
अॅड. दीपक मापारी, शहरप्रमुख गजानन जाधव, सुदन अंभोरे, तारामती जायभाये, लूकमान कुरेशी, श्रीकांत मादनकर, तानाजी मापारी, तानाजी अंभोरे, अमोल सुटे, शालिनी मोरे, अशपाक खान, आत्माराम राजगुरू उपस्थित होते.
शहरात वितरीत हाेणारे पाणी पिण्यास अयाेग्य जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेच्या सुक्ष्मजीवशास्त्र विभागाने १२ डिसेंबर २०२३, ८ फेब्रुवारी २०२४, १८ सप्टेंबर २०२४, ४ सप्टेंबर २०२४, ४ मार्च २०२५ व १७ एप्रिल २०२५ रोजी घेतलेल्या नमुन्यांमध्ये पाणी पिण्यास अयोग्य असल्याचे स्पष्ट नमूद केले आहे. दूषित पाण्यामुळे मुले, वृद्ध नागरिकांना डायरिया, पोटाचे विकार, कावीळ यांसारखे आजार जडत आहेत. याला सर्वस्वी नगर परिषद प्रशासन जबाबदार असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे.