मोताळा तालुक्यात ढगफुटी सदृश पाऊस; हजारो हेक्टरवरील पिकांचे नुकसान! आ.संजय गायकवाडांची पाहणी; अधिकाऱ्यांना तात्काळ मदत देण्याचे निर्देश...
आपत्तीग्रस्त भागाची आ. संजय गायकवाड यांनी रविवारी पाहणी केली. त्यांनी अधिकाऱ्यांना नुकसानीचा तात्काळ सर्वे करून शेतकऱ्यांना सरसकट मदत देण्याचे निर्देश दिले. या वेळी तहसीलदार, मंडळ अधिकारी आणि कृषीसेवक उपस्थित होते.
धामणगाव बढे, पिंपळगाव देवी, पिंप्री गवळी, शेलापूर या चार महसूल मंडळांतील अनेक गावांमध्ये १००० ते ११०० हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे १०० टक्के नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. नदी-नाल्यांना पूर आल्याने व्याघ्रा नदी परिसरात पाणी कंबरभर साचले. गोतमारा, कुहा, कोन्हाळा, पान्हेरा, किन्होळा, सारोळा, फर्दापूर, वडगाव, रिधोरा, गुगली, कोल्ही गवळी, लिहा, निपाणा, मालेगाव, दहीगाव, उन्हा या गावांतील शेतकऱ्यांचेही मोठे नुकसान झाले आहे.
या पावसामुळे कापसाच्या झाडावरील बोंडे गळून पडली, तर काही ठिकाणी कोंब फुटल्याने कापसाची प्रत खालावली आहे. मक्याच्या गंजीत साचलेले पाणी आणि वाहून गेलेली ठिबक पद्धतीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.
आ. गायकवाड यांनी प्रत्यक्ष पाहणीदरम्यान नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी एक लाख रुपयांची मदत दिली. त्यांच्या सोबत विधानसभा समन्वयक अॅड. गणेशसिंग राजपूत, पृथ्वीराज गायकवाड, भोजराज पाटील, रामदास चौथनकर, ज्ञानेश्वर वाघ आणि शिवसैनिक उपस्थित होते.
व्याघ्रा नदीवरील प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्याने परिसरातील शेतं जलमय झाली आहेत. शेतकऱ्यांनी शासनाने तातडीने आर्थिक मदत जाहीर करून शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहावं, अशी मागणी केली आहे.
