बुलढाणा तालुक्यातील पाच गावात ढगफुटी; हजारो हेक्टर शेती पाण्याखाली; शेतकऱ्यांच्या आक्रोशाला न्याय द्या; जिल्ह्यात सरसकट ओला दुष्काळ जाहीर करा : जालिंदर बुधवत...
Updated: Sep 22, 2025, 13:27 IST
बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : तालुक्यातील पाडळी, गिरडा, मढ, गुम्मी व इज्लापूर या परिसरात रविवारी रात्री झालेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतात तलावासारखे पाणी साचले असून पिके पूर्णपणे पाण्याखाली गेली आहेत. या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आज सकाळी शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष स्थिती पाहिली. पाहणी दरम्यान बुधवत यांनी तात्काळ तहसीलदारांना फोन करून पंचनामे करण्याचे निर्देश दिले. “जगाचा पोशिंदा मोठ्या संकटात सापडला आहे. सरकारने तात्काळ शेतकऱ्यांच्या बांधावर यावे, पंचनामे करून योग्य तो दिलासा द्यावा. जिल्ह्यात सरसकट ओला दुष्काळ जाहीर करणे हीच काळाची गरज आहे,” असे आवाहन त्यांनी यावेळी केले. जिल्ह्यात पिकांचे मोठे नुकसान ढगफुटीमुळे फक्त बुलढाणा तालुक्यातच नव्हे तर चिखली, मेहकर, लोणार, सिंदखेड राजा, देऊळगाव राजा, मलकापूर, शेगाव व नांदुरा या तालुक्यांतही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
सोयाबीन, तूर, कापूस यांसारखी खरीप पिके बहरात आली असताना पावसाने ती पूर्णपणे उद्ध्वस्त केली आहेत. संत्रा, डाळिंब, केळी यांसारख्या फळबागाही पावसाने मोठ्या प्रमाणात बाधित झाल्या. नद्या व प्रकल्प ओसंडून वाहत असून नदीकाठची सुपीक शेती खरडून गेली आहे. सप्टेंबरच्या मध्यापासून जिल्ह्यात ढगफुटीसदृश पाऊस सतत होत आहे. त्यामुळे शेतकरी अक्षरशः हतबल झाला आहे. आधीच उत्पादन खर्च वाढला असताना या आपत्तीने शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. “नुकसानीचे सर्वेक्षण यंत्रणा करेलच; पण तोपर्यंत सरकारने सरसकट ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तात्काळ दिलासा द्यावा,” अशी मागणी जालिंदर बुधवत यांनी केली.