नेपाळमध्ये बुलढाण्याचे नागरिक अडकले? जिल्हा प्रशासन अलर्ट; कुटुंबीयांनी तातडीने ‘या’ लिंकवर माहिती नोंदवावी, आपत्कालीन कक्षाशी संपर्काचे आवाहन...

 
बुलढाणा (जिमाका : बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, विविध देशांतील तसेच महाराष्ट्रातील नागरिक आणि पर्यटक अडकले असल्याची माहिती आहे. या पार्श्वभूमीवर नेपाळमध्ये अडकलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील नागरिक आणि पर्यटकांची माहिती संकलित करून त्यांना आवश्यक मदत व समन्वय उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेतली आहे.

महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत यासाठी विशेष माहिती नोंदणी लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील कोणतेही नागरिक अथवा पर्यटक सध्या नेपाळमध्ये अडकले असतील किंवा त्यांचा कुटुंबीयांशी संपर्क होत नसेल, तर त्यांच्या कुटुंबीयांनी अथवा नातेवाईकांनी https://geospatial.mahaseoc.in/Sahayata_gulf/ या लिंकवर जाऊन संबंधित व्यक्तीची सविस्तर माहिती नोंदवावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

माहिती नोंदवताना ‘ही’ माहिती अचूक द्या

नोंदणी करताना संबंधित व्यक्तीचे नाव, मोबाईल क्रमांक, नेपाळमधील सध्याचे ठिकाण किंवा हॉटेल, प्रवासाचा तपशील तसेच उपलब्ध असल्यास कुटुंबीयांचा संपर्क क्रमांक अचूकपणे नमूद करावा. या माहितीच्या आधारे संबंधित यंत्रणांना अडकलेल्या नागरिकांशी संपर्क साधणे आणि आवश्यक मदत पोहोचविण्यासाठी समन्वय करणे सुलभ होणार आहे.तसेच नागरिकांनी किंवा त्यांच्या नातेवाईकांनी संबंधित तहसील कार्यालय अथवा जिल्हा आपत्कालीन कार्यकेंद्र, जिल्हाधिकारी कार्यालय, बुलढाणा येथेही तात्काळ संपर्क साधावा, असे प्रशासनाने कळविले आहे.

आपत्कालीन मदतीसाठी ‘या’ क्रमांकांवर संपर्क साधा

- जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्ष, बुलढाणा : ०७२६२-२४२६८३
- पोलीस नियंत्रण कक्ष : ०७२६२-२४२४००
- टोल फ्री : १०७७
- मोबाईल : ७०२०४३५९५४
नेपाळमधील आपत्तीग्रस्त भागात अडकलेल्या नागरिक आणि पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक माहिती संकलित करून संबंधित यंत्रणांशी समन्वय साधण्याचे प्रयत्न जिल्हा प्रशासनामार्फत सुरू आहेत. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता उपलब्ध अधिकृत माध्यमांद्वारे माहिती नोंदवून जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन डॉ. प्रविणकुमार देवरे यांनी केले आहे.